चिंचवड : तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अमित कांबळे या 19 वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. या खून प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले होते. मात्र, एक आरोपी अद्याप फरार होता. फरार असलेल्या आरोपीला खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अजिंठानगरातील घटना
अजय किशोर शिवगण (वय 34, रा. अजिंठा नगर, चिंचवड पुणे), असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबई महामार्गावरील खेड तालुक्यातील निगडी गाव, या ठिकाणाहून खेड पोलिसांनी पकडले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी मिळून अमित कांबळे याचा खून केला होता. अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी फरार होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
यापूर्वीच चौघांना अटक
आशीष गवळी, दीपक कांबळे (दोघेही राहणार अजंठानगर, चिंचवड), विनोद शिगवण, हरी शिगवण, अजय शिगवण अशी यापूर्वी अटक आरोपींची नावे आहेत. यातील विनोद शिवगण व हरी शिवगण या दोघांनी अमित कांबळे याला अजिंठानगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बोलावून नेले. त्या शेडमध्ये पाच जणांनी मिळून अमित कांबळे याला डोक्यात दगड घालून ठार मारले.