तीन वर्षात केवळ घोषणा, नागरिकांचा भ्रमनिरास

0

नंदुरबार । केंद्रातील मोदी सरकारने तीन वर्षात केवळ घोषणाच केल्या. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिराश झाला आहे. असा आरोप करत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत मोदी शासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध नोंदविला. ते म्हणाले की, युपीए शासनाच्या काळात ज्या योजनांना विरोध करण्यात आला होता त्याच योजना मोदी सरकारने आता अंमलात आणायला सुरूवात केली आहे. केवळ भाषणबाजीतून योजनांचा पाऊस पडला असून अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ दिसत आहे.

आक्रोश यात्रा काढून शासनाला घरचा आहेर
ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकर्‍यांसाठी जेव्हा संघर्ष यात्रा काढली जेव्हा एसी लक्झरीच्या मुद्द्यावरून टिका झाली. आता या सरकारचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे 75 लाखाच्या मर्सर्डीजमध्ये फिरून संवाद यात्रा काढत आहे या संवाद यात्रेला त्यांच्याच सत्तेतील शिवसेनेने विरोध दर्शविला. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांनी आक्रोश यात्रा काढून शासनाला घरचा आहेर दिला. नोटबंदी, सर्जीकल स्ट्राईक या सारख्या मुद्द्यांवर राज्यकर्त्यांनी राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करून आ.रघवुंशी पुढे म्हणाले की, मोदी सरकारने जनतेला जी स्वप्न दाखविली होती ती येणारया दोन वर्षात तरी पूर्ण करावीत, अन्यथा विविध विषयांवर भविष्यात देशात विरोधाची क्रांती घडेल, असा इशारा आ.रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.