पुणे । पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरू असून तीन ते साडेतीन वर्षात काही मार्गावर मेट्रो प्रत्यक्षात धावेल, असा विश्वास महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. पुणेकरांच्या सहकार्यामुळे मेट्रोचे काम वेगाने चालले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींसाठी पालिकेच्या सभागृहात सोमवारी मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार, महामेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम याप्रसंगी उपस्थित होते.
50 लाख पुणेकरांचे स्वप्न साकार करण्याचे सौभाग्य महामेट्रोला लाभले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केल्यानंतर त्वरित कामाला सुरुवात करण्यात आली आणि पुणेकरांचे भरपूर सहकार्य लाभले. यामुळे डिसेंबरमध्ये भूमिपूजन झाल्यानंतर चार महिन्यात एप्रिलमध्ये काम सुरू करण्यास यश आले असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. तसेच दुसर्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम प्रत्यक्षात पुढील दोन महिन्यात सुरू होणार असून सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या सादरीकरणानंतर सभासदांनी मेट्रोबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्याला महामेट्रोचे सल्लागार शिशिकांत लिमये यांनी उत्तरे दिली.