मोक्काची तक्रार मागे घेतली नसल्याने तरुणाला मारहाण

0
पिंपरी :पिंपरी : तीन वर्षांपूर्वी मोक्काची तक्रार दिली. त्यामध्ये आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली. याचा राग मनात धरून मोक्काची तक्रार मागे न घेतल्यावरून दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरात दहशत पसरविली. हा प्रकार शनिवार (दि. 7) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर मधील संतोषी माता चौकात घडला. लखन रघुनाथ पवार (वय 30, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज विटकर (वय 26, रा. विटकर चाळ, नेहरुनगर, पिंपरी), हर्षल उर्फ गबर्‍या पवार (वय 27, रा. विजय प्रभा हाऊसिंग सोसायटी, नेहरुननगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षे कारागृहात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन पवार यांनी 2015 मध्ये विटकर विरोधात मोक्क्याची तक्रार दिली होती. त्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली. गुन्ह्यातील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली. परंतु त्याचा राग मनात धरून विटकर आणि हर्षल या दोघांनी लखन यांना ‘तुझ्यामुळे आमची तीन वर्ष वाया गेली. तुला लय माज आलं का’ असे म्हणत मारहाण केली. हर्षल याने लोखंडी फायटरने लखन यांच्या तोंडावर मारले. यावेळी लखन यांचा मित्र विशाल भोसले आणि आजूबाजूचे नागरिक भांडण सोडविण्यासाठी गेले असता, विटकर याने लोखंडी कोयता हवेत फिरवून ‘कोणी समोर आले तर त्याचे हात पाय तोडून टाकेल.’ अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.