तीन वर्ष उलटूनही बहाळचा पशुवैद्यकीय दवाखाना अपूर्णच!

0

नियोजन समितीकडून यंदाही निधी नाही;
लवकरच निधी देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली माहिती

मुंबई:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बहाल येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामासाठी जानेवारी २०१५ ला मंजुरी मिळाली होती. मात्र तीन वर्ष उलटूनही बहाळचा पशुवैद्यकीय दवाखाना अपूर्ण अवस्थेत असल्याचे चित्र आहे. या दवाखान्याच्या इमारतीचे फरशी , प्लास्टर, दरवाजे-खिडक्या बसविण्याचे काम अद्याप शिल्लक असून यासाठी २०१७-१८ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद केलेली नसल्याची माहिती पशु संवर्धन मंत्र्यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. लवकरच निधीच्या उपलब्धतेनुसार शिल्लक बांधकाम पूर्ण करण्यात येईल असेही यात म्हटले आहे.

अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. या दवाखान्याच्या बांधकामासाठी जानेवारी २०१५ मध्ये २५ लाख एवढ्या खर्चास मान्यता मिळाली होती. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जि .प जळगाव यांनी मार्च २०१६ मध्ये कार्यारंभ आदेश दिला होता. मार्च २०१६ अखेर या कामावर ९.१६ लाख रुपये खर्च झालेला आहे. या दवाखान्याची अजून बरीच कामे शिल्लक असून यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली होती मात्र यावर्षी काहीही तरतूद झाली नसल्याचे मंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे. लवकरच निधीच्या उपलब्धतेनुसार शिल्लक बांधकाम पूर्ण केले जाईल असे पशु संवर्धन मंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.