पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे 125 वर्षे आहे. यानिमित्त महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने येत्या 24 तारखेला 3000 शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या मुर्त्या 116 शाळेतील विद्यार्थी साकारणार आहेत. यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉडमध्ये होणार असल्याचे महापौर मुक्त टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते. एकाच वेळेस 116 शाळातील विद्यार्थ्यांकडून 3000 मूर्ती बनविल्या जाणार आहेत. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा महापालिकेचा मानस आहे. याचबरोबर विविध क्षेत्रातील 125 नामवंत कलाकारांच्या हस्ते गुरुवारी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती आणि श्री अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे.