तीर्थक्षेत्र आळंदीत स्वच्छतेसाठी चकाचक अभियानला गती  

0
शहराची स्वच्छता पूर्वपदावर आणण्यास आरोग्य विभागाची बैठक
गेल्या तीन दिवसांपासून विशेष स्वच्छता मोहीम सुरू
आळंदी : आळंदी नगरपरिषदेने कार्तिकी यात्रेतील सोहळ्याची गर्दी कमी होताच येथील शहराची स्वच्छता पूर्वपदावर आणण्यास आरोग्य विभागा अंतगर्त कर्मचारी आणि खाजगी ठेकेदार यांची यंत्रणा यांच्यात संवाद साधून स्वच्छतेसाठी आळंदी चकाचक अभियान राबविले.  यात्रा काळात लाखो भाविक आळंदीत येऊन गेले. सुमारे 12 लाखांवर यात्रा काळात यात्रेकरूंची गर्दी आळंदीत होती. यात्रेच्या 28 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात तीन सत्रात जादा कामगारांचा वापर करून कार्तिकी यात्रा काळात स्वच्छता कायम ठेवण्याचे काम आरोग्य विभागाचे माध्यमातून करण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. यासाठी मुकादम मालन पाटोळे, विजय पवार व गोपाळ मोहरकर यांचे माध्यमातून कामगारांनी तसेच नगरपरिषदेच्या यंत्रणेने काम केले. गेल्या तीन दिवसांपासून आळंदीत विशेष स्वच्छता मोहीम राबवून आळंदी शहरातील स्वच्छता पूर्व पदावर आणण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे आळंदी कार्तिकी यात्रा नियोजन विभागाने सांगितले.
स्वच्छता कर्मचा़र्‍यांचे कौतुक
आरोग्य व स्वच्छता विभागाच्यावतीने आळंदी शहर चकाचक अभियान राबवित गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देत कचरा हटविण्यात आला. यामुळे अभियानचे दिंडी प्रमुखांनी स्वागत केले. विविध धर्मशाळांचे मालक, चालक, व्यवस्थापकांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचा़र्‍यांच्या कामाचे कौतुक केले. सार्वजनिक संस्था, धर्मशाळा येथील साचलेला कचरा उचलण्यास घंटागाड्यांना प्राधान्य दिल्याने स्वच्छतेच्या कामात संस्थाचालकांनी समाधान व्यक्त केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या नियंत्रणात कार्तिकी यात्रेचे आरोग्य सेवा प्रशासनाने कामकाज केले. स्वच्छता कायम ठेवण्यात आळंदी नगरपरिषद प्रशासनास यश आल्याचे आरोग्य विभागाच्या मुकादम मालन पाटोळे यांनी सांगितले. या स्वच्छता अभियानामध्ये नगरपरिषदेच्या शहर स्वच्छता ठेकेदारांचे जादा कामगार आणि सेवाभावी संस्थाचे सहकार्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रावळी, द्रोणचा कचरा जास्त
आळंदीत नगरपरिषदेच्या माध्यमातून प्लास्टिक वापरावर बंदीचे निर्णयाने शहरात प्लास्टिकमुक्त आळंदी अभियान यशस्वी झाले. यासाठी समर्थ इंटरप्रायजेसच्यावतीने प्लास्टिक कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत प्लास्टिकचा कचरा नगण्य मिळाला. पत्रावळीत कागदी पत्रावळी व द्रोण जास्त प्रमाणात कचर्‍यात आले. यावर्षी थर्माकोल पत्रावळी आणि द्रोणचे प्रमाण कमी आढळले. यामुळे आळंदी प्लास्टिक मुक्त होण्यास मदत झाली. यासाठी यशोधन महाराज साखरे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठकीत केलेल्या सूचनां प्रमाणे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी आरोग्य विभागाच्यावतीने काम करून घेतले. विविध खाते प्रमुखांकडून नियोजना प्रमाणे तयारी केल्याने शहरासह केळगाव व चर्‍होलीमध्ये देखील यावर्षी नगरपरिषदेने स्वच्छतेचे काम केले. यात आळंदीला जोडणार्‍या रस्त्यांचे दुतर्फा कचरा संकलनास नगरपरिषदेची वाहने पुरविण्यात आली होती.
देवस्थान कर्मचारीही सहभागी
यावर्षी आळंदी लगतच्या गावांमध्येदेखील जंतुनाशके फवारणी, धुरीकरण, कचरा संकलन, पावडरची फवारणी करीत भाविकांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या आळंदी चकाचक या उपक्रमाचे सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. मंदिर परिसरात आळंदी देवस्थान देखील कामगार तैनात करून मंदिर व नदी परिसरात स्वच्छता करण्यास सुरुवात केल्याने तीर्थक्षेत्र आळंदी चकाचक ला गती मिळाली. मंदिरात स्वकाम सेवा मंडळ, विश्‍व सामाजिक संस्था, संत गाडगे महाराज संस्था यांनी यात्रा काळात स्वच्छता मोहीम राबविली. जनजागृतीसाठी जाहिरात फलक लावल्याने आळंदी चकाचक अभियानाला गती मिळाली. आळंदी कार्तिकी यात्रा काळात गोपाळ मोहरकर यांनी स्वच्छता विभाग व जादा कामगार यांचेत संवाद साधून स्वच्छ आळंदी ठेवण्यास दक्षता घेतली.