आळंदी : स्वच्छता अभियानांतर्गत तीर्थक्षेत्र आळंदी शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कामाला लागले आहे. त्यासाठी येथे स्वच्छतागृहांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्य शासनाच्या सहकार्याने या उपक्रमास गती देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, कार्तिकी यात्रेत नागरिकांसह भाविकांनी सार्वजनिक स्वच्छता, तसेच आरोग्य सेवेबाबत दक्षता घेऊन स्वच्छतेस प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे. आळंदी शहर हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आले आहे. आळंदी नगरपरिषदेने शहरात स्वच्छता मोहीम राबवीत अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच याबाबतच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवून शहर हगणदारी मुक्त करण्याची घोषणा केली आहे.
स्वच्छतेसाठी जनजागृती
दरम्यान, शासन निर्णयानुसार आळंदीत स्वच्छतेबाबतच्या उपाययोजना करण्यात येत असून, जनजागृतीसाठी माहिती पत्रकांचे वाटप, जनजागृती फलक लावले आहेत. तसेच कार्तिकी यात्रेतही जागृती करण्यात येत आहे. यासाठी कार्तिकी यात्रा नियोजन पूर्व आढावा
बैठकीत नियोजन केले आहे. भाविक-नागरिकांनी देखील आपापला परिसर स्वच्छ ठेवून तीर्थक्षेत्र आळंदी शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
वैयक्तिक शौचालयास अनुदान
शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी नगरपरिषदेने काही लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास अनुदान देऊन प्रोत्साहन दिले असल्याने नागरिकांनीही याचा लाभ घेत काही ठिकाणी शौचालये बांधून घेतली आहेत. याशिवाय राज्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उपलब्ध निधीतून 14 ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम नियोजित असून, अनेक ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यात्रा काळात नगरपरिषदेने शहरात जनजागृतीसाठी आरोग्य सेवक-कामगारांचे पथक स्थापन करून पाठपुरावा सुरु केला आहे. आळंदीतील स्वयंसेवी संस्था आणि नागरिक-भाविकांनी देखील या मोहिमेस पाठिंबा दिला. तीर्थक्षेत्र आळंदी पवित्र, स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी जनहित फौंडेशनतर्फे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी केले आहे.
आळंदीत स्वच्छतेला प्राधान्य हवे
तीर्थक्षेत्र आळंदीत यात्रा, उत्सव कालावधीसह बाराही महिने भाविकांची सतत गर्दी असते. मात्र, सांडपाणी व स्वच्छतेचा प्रश्न असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे आळंदीत कायमस्वरूपी स्वच्छेतला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांसह भाविकांतून व्यक्त होत आहे. नगरपरिषद प्रशासनानेही भाविक व नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.