तीर्थक्षेत्र बळसाण्यात वर्षीतप, पारणा महोत्सवासाठी भाविकांची गर्दी

0

शिरपूर। साक्री तालुक्यातील बळसाणे तीर्थक्षेत्रात उन्हाळी सुट्टीत भाविकांची अक्षरशा रीघ लावली आहे. बळसाणे येथे चोवीस तीर्थकरांपैकी तेरावे तीर्थंकर स्वामी विमलनाथ भगवान गावाच्या मंदिरात विराजमान आहे तसेच गावापासून दोन किमीच्या अंतरावर 32 एकराच्या भव्य जागेवर विमलनाथाची मुर्ती तयार करून विशाल मंदिर उभारले आहे. या गावाला जागृत स्थान म्हणून ओळखले जाते याकारणाने बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी राहते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी बरोबर शासकीय नोकरदारांना जोडून दीड दिवसाच्या सुट्टया मिळाल्याने याकरिता दर्शनासाठी गर्दी होत आहे.

गावाला मंदिरांचा मोठा इतिहास
या परिसरात भाविकांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या परिसराला विश्वकल्याणक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. विमलनाथाच्या दर्शनासह पर्यटन ही साधले जात असल्याने येथे गर्दी होत आहे. तीर्थक्षेत्री जैन समाजाच्या मंदिरासोबत येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामुळे गावाला प्रतिपंढरपूराचे स्थान प्राप्त झाले आहे. कुलस्वामीनी कानुबाई मातेचे प्राचीन काळातील धाटणी दगडापासून बांधलेले मंदिर आहे. प्राचीन काळाचे काळ्या दगडाचे कोरीव काम केलेले महादेवाचे मोठे मंदिर देखील आहे तसेच हनुमंताची एकूण नऊ मंदिरे आहेत. एकूणच गावाला मंदिरांचा मोठा इतिहास आहे.

कुटुंबासह सहलीचा आनंद
या निमित्ताने वाहनांची मोठी वर्दळ सुरू असून पर्यटक कुटुंबासह सहलीचा आनंद घेण्यासाठी बळसाणे तीर्थक्षेत्रात येत आहेत. आलेल्या पर्यटकांमध्ये परराज्यातील पर्यटकांचा अधिक समावेश आहे. बळसाणे येथील बाहेरगावी गेलेले नोकरदार व व्यवसायिक अक्षयतृतीयाच्या निमित्ताने आपल्या परिवारासह गावावर आल्याने बळसाणे येथे आल्याने गर्दीने फुलून गेले आहे. रविवार हा सुट्टी चा दिवस असल्याने शासकीय कर्मचारी नियोजन करून येथे पोहोचले आहेत. आचार्य भगवंताच्या वर्षीतप पारणा महोत्सवामुळे भक्ती निवास भरू गेले आहे. पोर्णिमेला महाराष्ट्रासह, गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश , कर्नाटक , आंध्र प्रदेश ,बिहार , झारखंड आदी ठिकाणाहून पर्यटक येथे मुक्कामाला येतात. भाविकांना उतरण्याकरिता गावापासून दोन कि. मी. अंतरावर विश्वकल्याणक नावाची मोठी धर्मशाळा आहे तेथे भाविकांसाठी विमलनाथाचे मोठे मंदिर आहे त्यामंदिराचे दर्शन आपटून भाविक गावातल्या विमलनाथाच्या दर्शनाला आवर्जून येतात.

एक दिवस पारणा
अक्षयतृतीयेच्या निमित्ताने जैन समाजातील कठीणातले कठीण तप म्हणजे वर्षीतप. हा वर्षीतप एक दिवस निरंतर उपवास व एक दिवस पारणा असा सहा महिने उपवास व सहा महिने पारणा यालाच वर्षीतप म्हणतात. या वर्षीतपाची समाप्ती व सुरूवात अक्षयतृतीयाच्या पवित्र दिवसाला जैन बांधव करतात. वर्षीतप परमपूज्य आचार्य भगवंत दर्शनयशसुरीश्वरजी महाराज व नम्रयशविजयीजी महाराज यांनी केला आहे. यावेळीवर्षीतप पारणा महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी आचार्य भगवंत दर्शनयशसुरीश्वरजी महाराजांनी प्रवचनातून उपस्थिताना मार्गदर्शन केले.