बारामती । ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर स्थान आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्याचे ते शेवटचे टोक आहे. क्षेत्राच्या एका बाजूने नीरा नदी तर दुसर्या बाजूने भीमा नदी आणि तिसर्या बाजूस या उभयतांचा संगम. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. नीरा-भीमा संगमाचा परिसर एकेकाळी अतिशय निसर्गरम्य होता. ऋषी, साधू, तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते. अशा या स्थानाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून त्यामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले. श्रीनृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणीच होते. भक्त प्रल्हाद अनन्येसाधारण भक्तिभावाने नृसिंहांच्या ‘वालुकामय मूर्तीची’ पूजा करत असे, हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती या ठिकाणी गाभार्यात दृष्टीस पडते.
दोन्ही नद्यांच्यास पाण्यात मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या वरती उंच शिखर बांधण्यात आले आहे. नृसिंह गाभार्याच्यार उजव्या बाजूस लक्ष्मी मंदिर दिसून येते. काही सभामंडप, विस्तीर्ण ओवर्या आणि भव्य प्रवेशद्वारे पूर्व व पश्चिम दिशांना बांधण्यात आली आहेत. नीरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला गोलाकृती प्रचंड घाटाचे बांधकाम शके 1527 मध्ये त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले आहे. घाटामध्ये शिल्प सौंदर्य लक्षणीय आहे. घाटाच्या पायर्यात बसविलेल्या मोठ्या दगडातून हत्तीचे शिल्प घडविले आहेत. संगमात स्नान करून संगम घाट चढत असताना हत्ती आपली सोंड वर करून भक्ताला अभिवादन करून स्वागत करतात. हत्ती व सिंह यांची जोडी लक्ष वेधते शिवाय मगरीची पाच शिल्पे आहेत. समर्थ रामदास, संत तुकाराम, संत नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे केली आहे.
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर या क्षेत्राची मुंबई इलाख्याच्या गॅझेटिअरमध्ये (पान 261, , व्हॉल्यूम अठरा, भाग 3(1885)) नोंद घेण्यात आलेली आहे. श्रीलक्ष्मी-नृसिंह देवस्थानला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात श्रीनृसिंह जयंती नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. ‘नृसिंह जयंती’च्या- दिवशी भव्य सोहळा संपन्न होतो. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित राहतात व आपल्या दैवतापुढे नतमस्तक होतात. या ऐतिहासिक क्षेत्राचे महत्व ओळखून शासनाने सन 2001 मध्ये या क्षेत्रास राज्यसंरक्षिात स्मारक म्हणून घोषित केले आहे.
सुखसोयी उपलब्ध करणे
राज्य शासन श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करत आहे. पर्यटनाला चालना देऊन राज्याचे उत्पन्न वाढविणे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे व भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करणे यामागचा उद्देश आहे. आगामी काळात श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होऊन राज्याच्या विकासात व नावलौकिकात मानाचा तुरा रोवणार आहे. या पौराणिक आणि ऐतिहासिक देवस्थानाची कलाकृती अप्रतिम असून त्याला सलाम करावा अशीच आहे. भाविक, भक्त तसेच पर्यटकांना या तीर्थक्षेत्राची भेट नक्कीच अविस्मरणीय राहण्यासारखी आहे.
मुख्यमंत्र्यांचे कुलदैवत
श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. या भागात दौरे असतात. तेव्हा ते आवर्जुन कुलदैवत दर्शनासाठी येत असतात. त्यावेळी तेथील विकास कामांची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना प्रशासकीय अधिकार्यांना देतात. प्रशासकीय अधिकारी अत्यं त पारदर्शक व जबाबदारीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार कामकाज पाहत आहेत.
विकास आराखडा मंजूर
या राज्य संरक्षित स्मारकासाठी शासनाने 260.86 कोटी रुपयांच्या विकास आराखडा मंजूर केलेला आहे. विकास आराखड्यानुसार भक्त व पर्यटक निवास बांधकाम, सार्वजनिक सोयी सुविधा, माणकेश्वरवाडा संरक्षण भिंतीचे संवर्धन व बांधकाम, घन कचरा व्यवस्थापन, विदुतीकरण, पथदिवे, विदुत जनित्र, आस्तित्वातील रस्यांचे रुंदीकरण व पथसुशोभिकरण, बुडीत बंधारा बांधणे, जलक्रीडा प्रकाराकरीता धक्के व तराफे बांधणे, दळणवळण सोयीसुविधा इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. यातील मंदिर परिसराचा पर्यटनाचा विकास करणे, मंदिर-नगारखाना व दक्षिणेकडील निरा नदीवरीह संगम घाटाची पुरातत्वीय शास्त्र संकेतानुसार जतन व दुरुस्ती इत्यादी कामे सुरु आहेत.