तीर्थक्षेत्र संत मुक्ताईच्या महतनगर पुण्यभूमीत यंदापासून होणार परीक्रमा
ह.भ.प रवींद्र महाराज यांची संकल्पना : फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात परीक्रमा
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मुक्ताईनगरातील भूमीत संजीवन अंतर्धान पावल्या असून या भूमीच्या प्रत्येक कणाकणात रज-कणात अध्यात्मिक ऊर्जा सामावलेली आहे. हजारो वनस्पतींच्या वनराईने नटलेली ही भूमी आहे. इतर धार्मिक तीर्थक्षेत्रस्थळी भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा व शक्ती, मानसिक समाधान मिळते त्याच धर्तीवर आदिशक्ती मुक्ताईच्या भूमीला देखील परीक्रमेचा मार्ग असावा असा मनाशी संकल्प बांधून आदिशक्ती मुक्ताई संस्थान मुक्ताईनगरचे पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीला एक परीक्रमेचा मार्ग असण्याची संकल्पना मांडली आहे. या परीक्रमेतून भाविकांना आई मुक्ताईची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. परीक्रमेचा मार्ग सुमारे 50 ते 60 किलोमीटर असणार असून पायी प्रवासात दोन दिवसांचा मुक्काम करून परीक्रमा पूर्ण करता येणार आहे. ही परीक्रमा 2022 च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भाविकांच्या व वारकर्यांच्या सहभागाने करण्याचा त्यांचा मानस आहे.
असा असेल परीक्रमा मार्ग
आदिशक्ती मुक्ताईचे जुने मंदिरात भाविक जमल्यानंतर वढवा फाटा, तेथून चांगदेव गाव व नंतर चांगदेव महाराज मंदिर येथे दर्शन करून पुढे चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमावर नावेत बसून संगमाचे दर्शन व पुढे पैलतीर असलेल्या मेळसंगावे येथे पुरातन सिद्धेश्वराचे मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मेळसांगवे-पंचाणे गावातून ते मुंढोळदे मार्गे चिचफाटामार्गे उचंदा येथे आगमन व मुक्काम नंतर सकाळी उठून पूरनाड फाटा, खामखेडा येथून जुना कुंड रस्ता मार्गे पिंप्री अकराऊत, सातोडद्व निमखेडी खुर्द येथून श्रावणबाळ टेकडीवरून हरताळा येथे आगमन व मुक्काम, पुढे सकाळी उठून पुन्हा वढवा फाटा व तिथून परत जुन्या मुक्ताई मंदिरावर यायचे अशी पूर्ण तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर (महतनगर) ची परिक्रमा या मार्गातून होणार आहे. भविष्यात दरवर्षी या परीक्रमेचे आयोजन असणार असल्याची माहिती हभप रवींद्र महाराज यांनी दिली.