माजी विद्यार्थ्यांनी अनुभवले शालेय जीवन
पिंपरी : आजकाल सोशल मिडियाच्या वापरामुळे जग पुन्हा जवळ येऊ लागले आहे. जुने मित्रमैत्रिणी फेसबुक, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पुन्हा भेटू शकतात. नव्हे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारे तीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात एकत्र असलेले मित्रमैत्रिणी एकत्र आले आणि त्यांनी आपले शालेय जीवन परत एकदा अनुभवले. कासारवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील सन 87-88 ला दहावी उत्तीर्ण झालेले सुमारे शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनी तीस वर्षांनंतर परत एकत्र भेटले होते. डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकारिता, उद्योग, व्यवसाय, कामगार, अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत बनले आहेत.
शाळा हा प्रत्येकाच्या हृदयातील एक हळवा कोपरा असतो आणि शाळेतील मित्र हा त्या आठवणींमधला एक नाजूक दुवा असतो. तीस वर्षांनंतर परत भेटताना काही जणांना लगेच ओळखता आले तर काही जणांची ओळख पटवून घ्यायला थोडा वेळ लागला. मात्र या कार्यक्रमासाठी अनेकजण लांबून आले होते. मुले येऊ शकतात पण मुली येणे अवघड असते. मैत्रिणींनीही संसाराच्या व्यापातून वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. थोड्याश्या प्रौढ झालेल्या या विद्यार्थिनी परत एकदा शाळकरी बनून शाळेत जुन्या ओढीनेच जमल्या होत्या. शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, एकत्र बसून केलेला अभ्यास, सहल, स्नेहसंमेलन या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
शैलेन्द्र सांडभोर, कुंदा मते, वैशाली जवळकर, डॉ. रेखा सुपेकर, अनिल कातळे, राहुल धनकुडे, रमेश कोळी, लतीफ सय्यद, बाळासाहेब शिवशरण, दीपक माळी, नवीन बोराडे, शिवकुमार नायर, वैशाली दहिवळ, अनिता गोरडे, वैशाली देवकर, आशा लांडे याच्यासह इतर अनेकांनी आपल्या सहाध्यायींना भेटण्यासाठी एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेतले. तीस वर्षांपूर्वीचा शालेय काळ परत एकदा अनुभवून टवटवीत झालेले हे सर्वजण परत भेटीची ओढ घेऊनच आपापल्या घरी परतले हे मात्र नक्की.