ती जनहित याचिका संघाची!

0

कपिल सिब्बल यांचा खळबळजनक आरोप
न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण

नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली ती जनहित याचिका (पीआयएल) फिक्स होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या माणसानेच ती दाखल केली होती. त्यामागे केवळ राजकीय हेतू होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला असून, न्यायव्यवस्थेने दबावाखाली येऊ नये, असे आवाहन केले आहे. सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला.

न्यायपालिका संकटात
कपिल सिब्बल म्हणाले, लोया प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता पीआयएल दाखल करण्यात आली होती. सूरज लोलगे नावाच्या व्यक्तीने ही पीआयएल दाखल केली होती. लोलगे हा नागपूरचाच असून भाजप आणि संघाच्या जवळचा आहे. त्याने महापालिका निवडणुकीत भाजपकडे तिकीटही मागितले होते. लोया प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जावे हाच त्यामागचा हेतू होता. न्यायपालिका संकटात आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे कोलेजियम जे म्हणते तेच होईल, असा कायदा सांगतो. मात्र केंद्र सरकारला त्यांच्या मनाप्रमाणे सर्व काही व्हावे असे वाटते. त्यामुळे कोलेजियमच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात असून, या शिफारशी मंजूर केल्या जात नाहीत, असा आरोप सिब्बल यांनी केला. भाजप म्हणते देश बदलत आहे. पण, देश बदलला आहे, असा आमचा दावा आहे. कारण न्यायपालिकेसोबत जो व्यवहार सुरू आहे, तो देशातील जनता पाहातच आहे. जस्टिस जोसेफ यांना सरन्यायाधीश होऊ द्यायचे नाही, हे सरकारने ठरवले आहे, असेही सिब्बल म्हणाले.