रस्त्यावरून चालताना सहजच समोर लक्ष गेले आणि हादरलोच. ती दिसली. वय खेळण्या-बागडण्याचे. दीड-दोन फूट उंचीची चिमुरडी किमान चार-पाच रिकामी प्लास्टिकची पाण्याची भांडी वाहून नेत होती. खरेच हादरलो. आजवर ग्रामीण भागात एखादा छोटा हंडा घेऊन जाताना मुले दिसायची. पण ही चिमुरडी खूपच लहानगी. त्यात ती जेथे दिसली तो एकविसाव्या शतकातील शहर म्हणवले जाणार्या नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोरचा आलिशान रस्ता. रस्त्यावरील तुमच्या-माझ्यासारखे पाच-पन्नास रुपयांच्या बाटल्या पाणी प्यायल्यानंतर किंवा काहीवेळा तर अर्धवटच पिऊन तशाच फेकणारी. कचर्याच्या डब्याचीही वाट न पाहता रस्त्यावरच! आणि त्याच रस्त्यावर दिसलेली ही चिमुरडी पाण्यासाठी भांड्यांचे ओझे घेऊन चाललेली. विरोधाभासामुळे असेल कदाचित पण डोळ्यात खुपलंच तिला तसे पाहून! आणि डोक्यातही काहूर माजले.
मी थांबलो. सोबत गुरुदत्त होते. त्यांना आश्चर्य वाटले. मी पळत गेलो. त्या चिमुरडीला न थांबवता तिचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपले. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काहीच बोलली नाही. काही अंतरावर तिची थोरली ताई दिसली. काहीच वर्षे मोठी. पण मोठाली भांडी घेऊन. ते बोलायला तयार नव्हते. पण त्यांची रिकामी भांडी आणि रस्त्याची लांबी सांगत होती एकविसाव्या शतकातील शहराची टॅगलाईन वापरणार्या नवी मुंबईतील वंचितांसाठीच्या पाण्याचे एकोणिसाव्या शतकातील वास्तव!
एकीकडे हे ज्यादिवशी अनुभवले त्याच दिवशी खालापूरच्या अरुण नलावडेंची बातमी समोर आली. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्या मोरबे धरणाच्या उशाला असलेल्या चांगेवाडीची. धरण उशाला, कोरड घशाला आपण हे शब्द नेहमीच वापरतो. पण हे शब्दश: खरे ठरतात ते महानगरांना पाणीपुरवठा करणार्या धरणांच्या परिसरात फिरताना. चांगेवाडीचाही अपवाद नाही. केवळ स्वत:तला माणूस जागा करा. कल्पना करा. तुमच्या समोर काही अंतरावर एका मोठ्या धरणाचा काही दशलक्ष लोकांना पाणीपुरवठा करणारा विशाल जलाशय पसरला आहे आणि तुम्ही मात्र त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने घोटभर पाण्यासाठी तरसता आहात! कसे वाटेल?
चांगेवाडीच्या मायभगिनींना रोजच तसे वाटते. पाणी पाहण्यासाठी आहे. मात्र, पिण्यासाठी नाही! त्यांना डिसेंबरपासूनच पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्याबाबतीत नवी मुंबईची ती लेक सुदैवी. किमान चालायला रस्ता चांगला. येथे चांगेवाडीच्या मायभगिनींना माथेरानच्या दिशेने खोल दरी उतरावी लागते. काही ठिकाणी तर एक माणूसच चालू शकेल अशा अवघड पायवाटेवरून तेथून धारणी नदीच्या कोरड्या पात्रात पोहोचायचे. तेथे खड्डा खोदून साठलेले झर्याचे पाणी हंड्यात भरून पुन्हा तीच धोकादायक कसरत करत परतायचे. हौसेने जलीकट्टूच्या माजलेल्या बैलांसमोर येणार्या हौशी शौकिनांची, माजलेल्या बैलांचीही काळजी घेणारे ज्या देशात आहेत, त्याच देशात या मायभगिनींच्या धोकादायक पायपिटीला थांबवणारा माणूस असणारा अधिकारी किंवा नेता कुणीच नाही का?
खालापूर रायगड जिल्ह्यात येते. सुनील तटकरेंसारखे तालेवार नेते. अ. रा. अंतुलेंसारखे तडफदार मुख्यमंत्री. प्रकाश मेहतांसारखे वजनदार पालकमंत्री. मात्र, तेथेच हिरकणीला आजही पाण्यासाठी चकमक कड्यासारखा धोका पत्करावा लागतो. फरक एवढाच की नोकरशाहीने तक्रार करूनही आपुलकीने आपल्या माणसाला समजून घेणारा आपला वाटणारा आपला शिवाजी राजा आता नाही.
तेच नवी मुंबईचे. गणेश नाईक. नवी मुंबई म्हणजे गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई. अगदी निवडणूक हरल्यानंतरही त्यांचा प्रभाव कमी झाला म्हणता येत नाही. मुलगा, पुतण्या सारेच महापौर झाले. आमदार, खासदार झाले. जमले असते तर आयुक्तही केले असते. पण आयएएस कोणी झाले नसावे. डॉक्टरेटसारखी ते मिळवता येत नाही, नाही तर तेही केले असते. बाकीच्या नेत्यांचे काय सांगणार? मंदा म्हात्रेंना बंगला वाचवायचा, नाहटांना प्रशासकीय सेवा सोडल्यानंतरचे राजकारणाचे व्हीआरएस पॅकेज टिकवायचे, असे प्रत्येकालाच काही ना काही व्याप. तुकाराम मुंढे मनपा आयुक्त तरुण तडफदार. त्यांची एकच अडचण. वैचारिक, राजकीय वादातून वेळ मिळाला तर ते अशा वंचितांकडे पाहणार ना! पुन्हा एक अडचण अशा वंचितांच्या भागात वॉक विथ कमिशनर ठरवणारे नेतेच नसावेत.
अडचण हीच आहे. वैचारिक गदारोळच एवढे माजवले जातात की त्यात सामान्यांच्या प्रश्नांकडे सहजच दुर्लक्ष होते किंवा जाणीवपूर्वच केले जाते. भक्त असो की द्वेषग्रस्त सारे सारखेच. आंधळे झालेले. लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे वेळ दिला पाहिजे, असे सध्या कोणालाही वाटते असे दिसत नाही. पूर्वी उजवे, काँग्रेसवाले यांच्यावर डावे, समाजवादी हे मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भावनात्मक राजकारण केले जाते, असे आरोप करायचे. मात्र, आता तेही मोदीद्वेषग्रस्त होऊन वैचारिक गदारोळात दंग झालेले दिसतात. मोदीभक्तांचे काय सांगणार? ते तर अंगावर येतील! पूर्वी काँग्रेसच्या राज्यात तुम्हाला ही पाणीटंचाई दिसत नव्हती का, असे दरडावतील! त्यांच्यासाठी जगातील अच्छे युगाचा प्रारंभच 2014पासून झाला आहे!
त्यामुळे खालापुरातील चांगेवाडीच्या त्या मायभगिनी असो किंवा नवी मुंबईतील ती चिमुरडी. ती काय करते? याची काळजी आपल्यालाच करावी लागणार आहे. त्यांना कशी मदत करता येते ते पाहू या. ती काय करते, तर जीव धोक्यात घालून पाणी भरते असे असू नये. किमान तेवढे आपण करूच शकतो! व्यवस्थेला शिव्या घालताना आपणही व्यवस्थेचेच भाग आहोत हे कसे विसरायचे? अधिकारी, राजकारणी यांची व्यवस्था सुधरवताना आपल्यालाही सुधारावेच लागेल. आहे तयारी?
–तुळशीदास भोईटे
संपादक
दैनिक जनशक्ति, मुंबई आवृत्ती