‘ती’ सध्या बलात्कार झेलतेय…!

0

‘ती’ सध्या काय करतेय नावाचा चित्रपट सध्या फारच गाजतोय. खरंतर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीपासून ‘ती सध्या काय करतेय’चा ट्रेंड सोशल मीडियामध्ये फारच धुमाकूळ घालत आहे. ट्रेलर आल्यापासून तिच्या सध्याच्या कामाचे विविध गमतीशीर मेसेज व्हायरल झाले आहेत. ती_सध्या_काय_करते असा हॅशटॅग प्रचंड गाजतोय. तिच्याबरोबरच तो सध्या काय करतोय? याचीही चिंता तमाम नेटकरी अभिजनांना लागून राहिली आहे. आपल्या सामान्य जिंदगीपासून ते राजकारण, प्रेम, मैत्री तसेच समाजात होणार्‍या उलथापालथीचे प्रतिबिंब या मेसेजेसमध्ये दिसून येत आहे.

‘ती’सध्या काय करतेय? वर फेसबुकच्या दुनियेत मोठ्या प्रमाणात गाजत असलेली सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्यजनाची जाण असलेले अ‍ॅड. महेश भोसले यांनी लिहिलेल्या काही ओळी तिच्या अवस्थेवर अचूक भाष्य करतात असं वाटतं. त्यातल्या काही ओळी इथं देतोय. ते म्हणतात,
ती सध्या काय करते…?
ती गर्भात असतानाच तपासली जाते,
एखादीच ती अनेक यातनातून जन्म घेते,
मग ती जिवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची,
पण ती थांबली नाहीये ती लढलीय आणि लढतेयदेखील,
विनाकारण होणार्‍या स्पर्शासोबत, ती लढतेय छाताडावर
टपलेल्या वासनांध नजरेसोबत,
हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात
तर ती रोज मारली जातेय परंपरेने,
तिच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलात्कार,
त्या नराधमाने केलेल्या बलात्काराची पायरी करून
चढतात तिच्यावर हजारो राजकीय इमले.
(ही पूर्ण कविता त्यांच्या फेसबुकवर आहे.)

महेश दादांच्या या ओळी तिच्या वास्तविकतेवर नेमकं बोट ठेवतात. महिला सबलीकरण, स्त्री-मुक्तीच्या बाता करणार्‍या या जगात अजूनही दोन आणि पाच महिन्यांच्या निरागस चिमुरडीवर बलात्कार केला जातो, ही सकल समाजासाठीच अत्यंत शरमेची गोष्ट आहे. खरंतर आपल्या समाजात कुठलीही बलात्काराची घटना घडल्यानंतर त्याला धर्म, जाती, समुदायनिहाय पाहण्याची घाणेरडी मानसिकता प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. नजीकच्या काळातलं चित्र बघितलं तर दिल्लीत बसमध्ये निर्भयासोबत झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर अख्खा भारत देश रस्त्यावर उतरला. त्या वेळी लोकांच्या मनातील आग पाहून असं वाटत होतं की, आता देशात बलात्कार होणारच नाहीत. मात्र, बलात्कारी तर तिच्या निषेधाच्या मोर्चातदेखील असावेत, असंच वाटायला लागलंय. कारण मुलींच्या छेडछाडीच्या घटना आणि बलात्काराचे प्रमाण थांबण्याचे नावच घेत नाहीये. सगळीकडेच वासनांध नजरा आणि पाशवी किडे आपले लक्ष्य शोधत आणि ते लक्ष्य इमानेइतबारे पूर्ण करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रातच बोलायचं झालं, तर कोपर्डीची आग कमी होत नाही तोवर नाशिक, सांगली, नागपूर, सोलापूरच्या घटना समोर आल्या. अगदी विकृत पद्धतीने बलात्कार केला जातो आणि सहजच तिला मारूनदेखील टाकले जाते. मग मीडियात बातमी येते, सोशल मीडियावर भडास निघते. काही मोर्चे निघतात, आंदोलने होतात. या प्रत्येक स्तरावर एक वेगळा बलात्कार तिच्यासोबत होत राहतो.

अनेकदा तिच्या बलात्काराचे राजकारणदेखील होते. अर्थातच यासाठी प्रशासन व्यवस्था किंवा सुरक्षा व्यवस्था काय करत आहे? हा प्रश्‍न उभा राहतोच. मात्र, बलात्कार प्रकरणात ओळखीच्या नराधमाकडूनच जास्त प्रमाणात अशा प्रकाराला अंजाम दिला जात असल्याने घटना रोखण्यात ही व्यवस्था काही करू शकत नाही. मग यावर उपाय काय होऊ शकतो? या गंभीर प्रश्‍नावर कुटुंबामध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. अवघ्या पाच महिने किंवा पाचवी, सहावीच्या वर्गापर्यंतच्या चिमुरड्या ज्यांना स्पर्शदेखील समजत नाही. अगदी निरागस विश्‍वात जगणार्‍या चिमुरड्यासुद्धा काही घटनांमध्ये बळी पडत आहेत, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. बलात्कारासारखी घटना घडल्यावरसुद्धा मुलगी कोणत्या जातीची आहे? हे सर्च करणारा दुसरा बलात्कारी वर्गसुद्धा इथे उपलब्ध आहे. अशांना खरंतर माणूस म्हणवून घेण्याचा काहीही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टींना भोगणारा स्त्री हा आजच्या घडीला सर्वात उपेक्षित घटक आहे. म्हणूनच स्त्रीने स्वतः किमान स्वतःपुरते सक्षम होणे आवश्यक आहे.

सुलतान, दंगल यांसारखे किंवा स्त्री-पात्र हिरो म्हणून बनवले गेलेले सिनेमे पाहून तेवढ्यापुरतेच प्रभावित होणारे अनेक आहेत. पोरींनी असं बनावं असे म्हणणारे पालक असतील किंवा स्वतः ती पोरगी असेल तिने खरंच आज या भयंकर विक्षिप्त असलेल्या जगात आपलं स्थान मजबूत करणे आवश्यक आहे. परंपरा, सामाजिक व्यवस्थेचं लोढणे आपल्या गळ्यात बांधून घेऊनदेखील पुरुषी मानसिकतेच्या दलदलीत पहिल्यापासूनच स्वकर्तृत्वाचे कमळ तिने फुलवले आहे. निश्‍चितच स्त्री आज कुठेच कमजोर नाही, हे स्पष्ट आहे. वासनांध पुरुषी नजरा रोखणे कठीण आहे, म्हणूनच प्रत्यक्ष वैयक्तिकरीत्या महिलेने मजबूत होणे हाच सशक्त परिणाम आहे. अन्यथा मतीचा शारीरिक व सामाजिक बलात्कार होतंच राहील. आपल्याच लुटलेल्या अब्रूच राजकारण तिला बघत बसावे लागेल व तोफ पूर्वापारपद्धतीने जमेल तसं बलात्कार करत राहील. बयो, दे हे ओझं झटकून आणि व्यवस्थेवरच उलट बलात्कार करण्याची क्षमता ठेव तुझ्यात, म्हणजे ती सध्या काय करतेय? हा सवाल तुला विचारला जाणार नाही.

निलेश झालटे
9822721292