तुकाराम मुंडे हाय-हाय!

0

पुणे । महापालिकेची मुख्यसभा सुरू असताना पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंडे निघून गेल्याने विरोधाकांनी याचा तीव्र निषेध नोंदवला. मुंडेंचा धिक्कार असो, मुंडे हाय हाय, अशी घोषणाबाजी करत त्यांना परत बोलवण्याची मागणी विरोधकांनी केली. पुणे महापालिका आयोजित पीएमपीएमएलच्या खास सभेला तुकाराम मुंडे बुधवारी उपस्थित राहिले. पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांनी तुकाराम मुंडे यांना उपस्थित राहणे बंधनकारक करत पीएमपीएमएल नियोजनासाठी खास सभेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. मुंडे आणि पालिका पदधिकार्‍यांमध्ये पास दरवाढ, कर्मचार्‍याचा बोनस या प्रकरणांवरून संघर्ष पाहायला मिळाला. मुंडे पदाधिकार्‍यांचे ऐकून घेत नसल्याच्या तक्रारीचा सूर पदाधिकार्‍यांकडून ऐकण्यास मिळत असे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीएमएलमध्ये असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्य सभेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव सभासदांनी स्थायी समितीने मंजूर केला होता. या प्रस्तावात तुकाराम मुंडे आणि पीएमपीएमएल अधिकार्‍यांनी या बैठकीला हजर राहणे बंधनकारक करावे, असे नमूद करण्यात आले होते.

हे कोण नवीन अधिकारी?
सभागृहात कोणी नवीन अधिकारी आले असता त्यांची सभागृहाला ओळख करून देण्याची पद्धत आहे. त्यामुळे पीएमपीचे हे नवीन अधिकारी कोण आहेत हे आम्हाला माहित नाही, असे सांगत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांना स्वतःची ओळख करून देण्यास सांगितले. यावर तुकाराम मुंडे यांनीही स्मितहास्य देत ’मी तुकाराम मुंडे’ पीएमपीचा अध्यक्ष असल्याचे सांगत बोलण्यास सुरुवात केली. यापूर्वी महापलिकेतील विषय समिती निवडणुकी वेळी पीठासीन अधिकारी असलेल्या तुकाराम मुंडे यांनी नगरसेवकांना आत येण्यापूर्वी ओळखपत्राची मागणी केली होती. त्याचाच वचपा नगरसेवक अरविंद शिंदे यांनी काढत मुंडे यांना आम्ही ओळखत नाही, त्यांनी सभागृहाला ओळख करून द्यावी, अशी मागणी केली.

सभा तहकूब करण्याची मागणी
तुकाराम मुंडे मुख्य सभेला उपस्थित राहिले होते. मात्र, केवळ हेडलाईन भाषण करून मुंडे मुख्यसभेतून निघून गेले. सभा सोडून जाण्याचे नेमके कारण मात्र समजले नाही. सभेत पीएमपीएमएलचे अन्य अधिकारी मात्र उपस्थित आहेत. मुंडेंच्या या कृतीमुळे सभासदांनी नारेबाजी करत याचा निषेध केला. सभासदांच्या सूचना सुरू असतानाच मुंडे निघून गेल्याने सभागृहाचा अवमान झल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुंडेंना परत बोलवा, अन्यथा सभा तहकूब करा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.