तुकाराम मुंढेंची नाशिकला बदली!

0

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड/पुणे : आपल्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे राजकीय नेते आणि पीएमपीएमएल कर्मचार्‍यांसाठी डोकेदुखी ठरलेले पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बुधवारी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नयना गुंडे यांची नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली करण्यात आली असून, त्यांची मुंबईत मंत्रालयात नेमणूक करण्यात आली आहे. कामचुकार कर्मचारी व अधिकारी वठणीवर आणण्याचे काम मुंडे यांनी केले होते. त्यामुळे हे कर्मचारी चांगलेच धास्तावले होते. पैकी अनेकांना त्यांनी सरळ घरी पाठविले होते. मुंढेंची बदली होताच कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला.

वर्षभरातच मुंढे यांची बदली
नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यानंतर राज्य सरकारने पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणार्‍या पीएमपीएमएलवर व्यस्थापकीय संचालकपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती होऊन वर्षभराचा कालावधी होत आला असताना, आता त्यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे पुणे पालिका प्रशासनात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कारण मुंढे यांनी मागील वर्षभरात पीएमपीएमएलचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळून नागरिकांची मने जिंकली आहेत. मात्र, आपली धोरणे कठोरपणे राबवताना कामगार संघटनांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले आहे. पीएमपीएमएलच्या कामगारांनी गणवेशाऐवजी साध्या वेशात कामावर येणे, धूम्रपान करणे, डेपोतून वेळेवर बस बाहेर न काढणे, स्टॉपवर बस न थांबवणे, एका विभागात नियुक्ती असताना दुसर्‍याच भागात काम करणे या सवयी मोडीत काढत कामगारांना शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे नेहमीच कामगार त्यांच्यावर नाराज असत. त्यांची केव्हा बदली होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर बुधवारी त्यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे.

भाजपनेत्यांची फिल्डिंग यशस्वी
पुण्यातील शिवसृष्टीबाबत काल मुख्यमंत्र्याकडे पुण्यातील नेत्यांची बैठक झाली होती. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यासह इतर गटनेते या वेळी उपस्थित होते. या बैठकीच्या दरम्यानच मुंढे यांच्या बदलीची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना हटविण्यासाठीची भाजप नेत्यांची फिल्डिंग यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. 25 मार्च 2017 रोजी मुंढे यांची पीएमपीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. आपल्या कारकिर्दीत आपल्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन पीएमपीएमएलचे कर्मचारी आणि राजकीय नेते, पदाधिकारी यांना सळो की पळो करून सोडले होते. पीएमपीएमएलचा गाडा रुळावर येत असतानाच 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तुकाराम मुंढें यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी 2008 च्या बॅचच्या नयना गुंडे यांची वर्णी लावण्यात आली आहे.

मी ज्या प्रकारे पीएमपीएमएल सक्षम करण्याचे काम केले आहे. त्यावर मी समाधानी असून अधिकारी, कर्मचारीवर्गानेदेखील माझ्या सूचनांचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आता पुढील काळात नाशिक महापालिकेतदेखील नागरीहिताचे निर्णय घेईल. पुणेकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो.
– तुकाराम मुंढे, अध्यक्ष पीएमपीएमएल