ज्येष्ठ नागरिकांचा पास 700 वरून पुन्हा 500 रुपये
पुणे:- तुकाराम मुंढे पीएमपी व्यवस्थापकीय संचालक असताना ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात करण्यात आलेली वाढ रद्द करण्यात आली असून सध्या 700 रुपयांना मिळणार पास आता 500 रुपयांना मिळणार आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला. याबाबतची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी
पीएमपीकडून दिल्या जाणार्या जेष्ठ नागरिकांच्या पाससंदर्भात दरवाढ करण्याचा निर्णय तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतला होता. मुंढे यांची नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी बदली झाल्यानंतर पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही दरवाढ रद्द करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. त्या ठरावाला आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नवनियुक्त पीएमपी संचालक नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, पुणे पालिका स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ, पिंपरी-चिंचवड पालिका स्थायी सामिती अध्यक्ष सीमा साळवे, पीएमपी संचालक सिद्धार्थ शिरोळे याच्यासह सर्व गटनेते उपस्थित होते.
निलंबीत कर्मचार्यांची सुनावणी
महापौर मुक्त टिळक म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरवाढी संदर्भात आजच्या बैठकीत ठराव मंजूर करून ही वाढ रद्द करण्यात अली आहे. त्यामुळे पासचे दर 700 रुपयांवरून पुन्हा 500 होणार आहेत. तसेच पूर्वी पुरवण्यात येणारी पंचिंग पासची सुविधा शालेय विद्यार्थ्यंसाठी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंढे यांनी केलेल्या 158 कर्मचार्यांच्या निलंबनाबाबत सुनावणी घेऊन त्याबाबत पुढील काळात निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापुराने सांगितले. सध्या पुणे शहरात 13 डेपो आहेत. त्यात नव्याने तीन डेपोची वाढणार होणार असून निगडी, सुतारवाडी आणि वाघोली याठिकाणी डेपो सुरु करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
पीएमपीच्या ताफ्यात 200 मिडीबस येणार
8 मार्चपासून पीएमपीच्या ताफ्यात 200 मिडीबस टप्प्याटप्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरीकांचे प्रवासाचे हाल काही प्रमाणात कमी होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातपहिल्या टप्प्यात 60 बस येणार आहेत.