बारामती : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उंडवडी (ता. बारामती) येथील मुक्कामात स्वयंपाक बनवत असताना गॅसचा भडका उडून लागलेल्या आगीत सहा तंबू जळून खाक झाले. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. शुक्रवारी सायंकाळी पालखी मुक्कामाला येण्यापूर्वी पुढे आलेल्या भैरवनाथ प्रासादिक दिंडीच्या तंबूला आग लागली. आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. आसपास जवळपास दीडशे तंबू टाकण्यात आलेले आहेत.
स्वयंपाक बनविताना लागली आग
दौंड तालुक्यातून रोटी घाट मार्गे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी बारामती तालुक्यात आगमन झाले. दौंड आणि बारामतीच्या सीमेवर गुंजखिळा येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वीच पालखी उंडवडीच्या माळावर मुक्कामी असल्यामुळे तंबू उभारण्यासाठी दिंडीतील गाड्या पुढे आल्या. या परिसरात जवळपास दीडशेहून अधिक तंबू उभारण्यात आले. भैरवनाथ प्रासादिक दिंडी अष्टापूर (ता. हवेली)च्या तंबूमध्ये महिला स्वयंपाक बनवित होत्या. अचानक गॅसचा भडका उडाला आणि तंबूला आग लागली. त्यामुळे त्या तंबूसह शेजारच्या सहा तंबूंनी पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गॅस सिलिंडरदेखील तंबूतच होते. याची माहिती तातडीने पालखी समवेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला समजल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.