पिंपरी-चिंचवड : ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष, स्वागतासाठी मार्गात घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या, तत्पर सेवा पुरविणार्या विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते अशा उत्साही व भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराजांचा पालखीने शनिवारी सकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातून पुण्याकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यामुळे उद्योगनगरीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याचे चित्र पहायला मिळाले.
कपाळावर चंदन, गळ्यात तुळशीमाळ असलेले वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन निघालेल्या वारकरी महिला आणि मुखामध्ये हरिनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निगडी ते आकुर्डी दरम्यानच्या मार्गात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. विठ्ठल मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिरासमोर साकारलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालखीचे शहरात आगमन झाल्यामुळे निगडी गावठाण, प्राधिकरण, आकुर्डी, विठ्ठलवाडी या परिसराला वैष्णवांच्या मेळ्याचे स्वरुप आले होते. पालखी मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनांच्या वतीने वारकर्यांना अन्नदान व वैद्यकीय सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला होता.
आठ तासांनी सुरू झाला निगडी-आकुर्डी सेवा रस्ता
पालखीने पुणे शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर तब्बल आठ तासानंतर म्हणजे दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी आकुर्डी आणि निगडी येथील पुणे मुंबई महामार्गाचे रस्ते सुरु केले. सकाळी 10 वाजता पालखी फुगेवाडी पर्यंत पोहोचली. तोपर्यंत निगडीपासून नाशिकफाट्यापर्यंत पुणे मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे ग्रेड सेपरेटर आणि सेवा रस्ते रिकामे पडले होते. पालखी दूरपर्यंत गेल्यानंतर मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे अपेक्षित होते. महामार्ग बंद केल्यामुळे वाहनचालकांना अंतर्गत रस्त्यावरून वाहतुकीची कोंडी फोडत आपल्या इच्छित स्थळी जावे लागले. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली पाहायला मिळाली.
वाहतूक विभागाकडून देण्यात आलेले शहरातील पर्यायी रस्ते अरुंद असल्याने तसेच त्या रस्त्यांवर योग्य नियोजन नसल्याने रस्ते सकाळपासून भरले आहेत. निगडी मधील पवळे उड्डाणपुलाखाली बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ही वाहतूक भेळ चौक आणि यमुनानगरकडे वळविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.