परतीच्या मार्गावरील पालखीचा चिंचवडगावात विसावा
टाळ-मृदुंगाच्या गजरात जंगी स्वागत
पिंपरी-चिंचवड : आषाढीवारी करुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यंदा प्रथमच या पालखीने चिंचवडगावात काही वेळासाठी विसावा घेतला. यावेळी महासाधू मोरया गोसावी यांची पालखी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा अपूर्व भेटीचा सोहळा भाविकांना प्रथमच अनुभवायला मिळाला.
मार्गावर रांगोळ्या, पुष्पवृष्टी
पिंपरी गावात मंगळवारी रात्री मुक्कामाला थांबलेली तुकोबारायांची पालखी सकाळी सातला चिंचवड गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. लिंक रोडच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. सर्वांच्या चेहर्यावर उत्साह होता. हॉटेल इगलपासून लिंक रोडवरून टाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत केले. चिंचवडच्या गांधी चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने विसावा घेतला. त्याचवेळी या ठिकाणी आलेल्या महासाधू मोरया गोसावी यांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. वारकर्यांसह भाविकांसासाठी अल्पोपहाराची सोय केली होती.
जयघोषाने परिसर दुमदुमला
पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, मंदार देव महाराज तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांचा सत्कार देव महाराजांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे एक शिल्प पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांना भेट देण्यात आले. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या जयघोषाने चिंचवडगाव दुमदुमून गेले. वारकर्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ वाजता पालखी देहूकडे मार्गस्थ झाली.