तुटून उघड्यावर पडलेल्या वीजतारेमुळे विजेच्या धक्क्याने 5 म्हशींचा मृत्यू

0

कुसूंबा शिवारातील घटना ; एक म्हैस जखमी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद

जळगाव – गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पाऊसामुळे तुटून उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारेला जोरदार धक्क्याने चरण्यासाठी गेलेल्या पाच म्हशींना जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कुसूंबा शिवारात घडली. या घटनेत एक म्हैस जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

शहरातील इंदिरानगर प्लॉट नं 227 येथे धनराज रामकृष्ण पाटील वय 60 हे वास्तव्यास असून ते शेती करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या 40 म्हशी आहेत. या म्हशींना घेवून धनराज पाटील हे 5 रोजी कुसूंबा शिवारात घेवून गेले. भास्कर शिवसिंग पाटील यांचे शेताजवळील प्लॉटमध्ये म्हशी चरत असताना याठिकाणी वीजखांबावरील तुटून जमीनीवर पडलेल्या वीजप्रवाह असलेल्या तारेला सहा म्हशींचा स्पर्श झाला. व जोरदार धक्का बसल्याने म्हशी जमिनीवर पडल्या. याबाबत धनराज पाटील यांनी कुसूंबा गावात रविंद्र शांताराम पाटील, राधेशाम चौधरी यांना घटना सांगितली. त्यानंतर वायरमन यांनी पुरवठा खंडीत केला. यानंतर घटनास्थळी जावून पाहणी केल्यावर विजेचा धक्का बसलेल्या सहा पैकी 5 म्हशींचा जागीच मृत्यू झाला होता. तर एका म्हशीवर कुसूंबा येथीलल डॉ. संदीप पाटील यांनी उपचार केले. 

एमआयडीसी पोलिसांकडून पंचनामा
धनराज पाटील यांनी प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळविला. माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल रतिलाल पवार यांनी घटनास्थळ गाठले. व घटनेचा पंचनाम केला. याबाबत धनराज पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.