पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने गुंडांना पक्षात घेतल्याची टीका सर्वच विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात भाजपवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले. कालपर्यंत तुमच्यासोबत बसणारे सज्जन होते. पण तेच एका रात्रीत आमच्याकडे आले आणि गुंड झाले? हे कुठले वक्तव्य आहे, असा सवाल बापट यांनी शरद पवार यांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. पवार हे या जिल्ह्यातील आहेत. ते आदर्श नेतेही आहेत. पण ते नेहमी सांगतात, तसे काहीही होत नाही. शरद पवार यांनी नुकतेच निवडणुकीविषयीचे भाकीत केले. मात्र महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे माझ्याकडून लिहून घ्या, असे गिरीश बापट यांनी ठामपणे सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, उमा खापरे आदींसह इतर नेते उपस्थित होते.
विनाकारण आरोप करण्याची आमची संस्कृती नाही
राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते. कोणावर गुंड, भ्रष्टाचारी असे आरोप करण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. असेल तर ती भुजबळ यांच्यावर जशी कारवाई झाली, अशा प्रकारची कारवाई करण्याची संस्कृती भाजपची आहे, असे सांगून गिरीश बापट यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आम्ही राजकारणाची उंची वाढवण्याचे काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या राजकीय क्षेत्रातील कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त केंद्रातील भाजप सरकारने मोठेपणा दाखवून त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, असेही बापट म्हणाले. आमच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर आम्ही टीका करतोच, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जे काही विधान केले, त्याआधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काय म्हणाले ते पाहावे. ज्या लोकांबाबत वक्तव्य केले ते शरद पवार यांच्यासोबतच बसत होते, असा आरोपही बापट यांनी यावेळी केला. तुमच्यासोबत बसणारे लोक सज्जन होते आणि तेच लोक आमच्याकडे आल्यानंतर गुंड झाले? हे कुठले वक्तव्य, असा सवालही त्यांनी शरद पवार यांना केला.