तुमच्या पक्षातील ‘आजी-आजोबां’नी इंग्रजांशी हातमिळवणी केली – कपिल सिब्बल

0

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या आजी- आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकली होती का?, असा प्रश्न विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. हिराकूड धरण, सरदार सरोवर धरण आणि भाकरा धरण हे कोणी बांधले होते ?, असा प्रतिप्रश्न त्यांनी मोदींना केला आहे. तुमच्या पक्षातील ‘आजी-आजोबां’नी इंग्रजांशी हातमिळवणी केली. पण मोदींना हे माहित नसावे, अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगडमधील सभेत घराणेशाहीवरुन काँग्रेसवर निशाना साधला होता. इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाव’ असा नारा दिला. पण देशातील गरीब कमी झाले का?, तुमच्या आजी- आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकली होती का?, असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी शनिवारी ट्विटरद्वारे मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

‘मोदीजी राहुल गांधींना विचारतात की तुमच्या आजी- आजोबांनी पाइपलाइन टाकली का ?, मग मोदीजी तुम्ही तरुण असताना रेल्वे स्थानकातील फलाटांवर कुठून पिण्याचे पाणी यायचे. नेहरु यांनी आधुनिक औद्योगिक भारताची पायाभरणी केली. पण तुमच्या पक्षातील आजी- आजोबांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती’, असे ट्विट सिब्बल यांनी केले.