नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज गुरुवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे अभिनंदन मोदींनी केले. यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार आरोप करत तोंडसुख घेतले. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने देशासाठी अनेक कल्याणकारी कामे केली, म्हणूनच जनतेने पुन्हा भाजपला बहुमताने सरकारमध्ये आणले. सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याच्या विचारावर हे सरकार चालत आहे. कॉंग्रेसच्या विचारावर हे सरकार चालले असते तर ७० वर्षापासून कायम असलेले प्रश्न कायमच राहिले असते.
‘तुमच्या मार्गावर चाललो असतो तर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटले नसते’, ‘मुस्लीम महिलांमध्ये तीन तलाकची भीती आजही कायम असती, ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली नसती’, ‘राम जन्मभूमीचा वाद आजही कायम राहिला असता’, ‘कर्तारपूर कोरिडोअर कधीही झाले असते’, ‘भारत-बांगलादेश विवाद कधीही मिटला नसता’ यांसह अनेक मुद्द्यांवरून मोदींनी कॉंग्रेसला फटकारले. ५० वर्षापासून विवादित प्रश्न सोडवून या सरकारने ‘सबका साथ सबका विकास’चा मूलमंत्र खरा ठरविला आहे असे मोदींनी सांगितले.
मतांचे राजकारण पाहून प्रलंबित प्रश्न कायम ठेवण्याचे विचार केला असता, हिंमत दाखविली नसती तर प्रश्न कायम राहिले असते असेही मोदींनी सांगितले.