नवी दिल्ली । आपल्या पक्षाच्या खासदारांच्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रूद्रावतार धारण करत त्यांना खडे बोल सुनावले. पक्षाच्या संसदीय बैठकीत त्यांनी चुकार खासदारांना 2019 मध्ये पाहून घेण्याची तंबी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहसह सर्व खासदारांनी भाजपाच्या बैठकीत सहभाग घेतला होता.
पंतप्रधान संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या संसदीय बैठकीत खासदारांना सूचक इशारा दिला. आता राज्यसभेत अध्यक्ष आले आहेत, तुमच्या मौजमजेचे दिवस आता बंद होतील. तुम्ही स्वतःला काय समजता. तुम्ही काहीच नाही, तर मीसुद्धा कोणीही नाही, जे काही आहे ते भाजपाचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तुमच्या हजेरीसाठी सारखा सारखा व्हिप का काढावा लागतोय ? तुम्हाला हजेरी लावण्यास वारंवार का सांगावं लागतंय ? आता ज्या खासदारांना जे करायचं आहे ते त्यांनी करावं, 2019मध्ये मी तुमच्याकडे पाहतो, असा इशारा मोदींनी खासदारांना दिला आहे. दरम्यान, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शाह यांचं लाडू भरवून स्वागत केलं.