नवापूर । मानवी जीवनात आपले स्वतःचे असे काय आहे जे आपण गर्व करतो ? या आभासी दुनियेत सारे काही नश्वर आहे. केवळ आपले सत्कर्मच आपले चांगले नाव राखते म्हणून आहे त्या परिस्थितीत आनंद मानत इतरांनाही आनंद देत सुखी जीवन जगण्यातच खरा पुरूषार्थ असल्याचे सांगत तुम्हीच तुमच्या सुखी जीवनाचे शिल्पकार आहात, असा मंत्रच काजलबेन ओझा-वैद्य यांनी येथे संध्यागोष्टी या कार्यक्रमात बोलतांना दिला. विविध विषयांना कलात्मकरित्या स्पर्श करित त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करित प्रबोधन केले. शहरातील नागरिकांसाठी सरदार चौकात काजलबेन ओझा-वैद्य यांचे संध्यागोष्टी या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांना जीवघेण्या स्पर्धेचा भाग बनवून त्यांचे बालपण हिरावू नका
आपण मुलांनाही याच जीवघेण्या स्पर्धेचा भाग बनवून त्यांचे बालपण हिरावून घेत आहोत. मुलांना त्यांच्या कलाने वाढू द्या. त्यांच्यावर सुसंस्कार घडवा, व्यवहार ज्ञान शिकवा. जे उपजत गूण आहेत त्यांचा सदुपयोग करा. विचारांनी आपण आधुनिक बनले पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. शिरीष नाईक व संयोजन समितीच्या वतीने दरवर्षी ख्यातनाम वक्त्यांचे, समाजसेवकांचे व्याख्यान आयोजित करण्यात येते. यावेळी शहरातील आपल्या प्रदिर्घ वैद्यकिय सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल डॉ. मंजुळाबेन शाह यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीष नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंदुरबार जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रजनी नाईक यांनी स्वागत केले. संचालन किरण टिभे व सुधिर निकम यांनी केले तर आभार संजय ठोसरे यांनी मानले. समिती सदस्य अजय पाटील, चंद्रकांत नगराळे, हरीश पाटील, नईम शेख, किरण बिरारी, शितल ठाकरे, मनोज पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.