विजयकुमार दत्तात्रय वैद्य! ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, ही उक्ती आपण माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या संदर्भात वापरतो, तशीच ही उक्ती विजय वैद्य यांच्या बाबतीतही लागू पडणारी आहे. इंग्रजी नवीन वर्ष घेऊन जन्माला आलेले विजय वैद्य हा खरे म्हणजे एक कादंबरीचा, ग्रंथाचा विषय होऊ शकतो. अनेक पैलू ज्याच्या अंगात पाहावयास मिळतात, असे हे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. अनेक पैलू म्हटल्यामुळे त्यांना आपण अष्टपैलू कसे म्हणणार? खरे आहे.
विजय वैद्य यांनी टाइम्स ऑफ इंडियात जॉब डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. पण, केवळ नोकरीत गुरफटून न राहता विजय वैद्यांनी वृत्तपत्र सृष्टी, साहित्य सृष्टी, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात स्वैरसंचार केला. परदेश दौरे केले. पुस्तके लिहिली. वृत्तपत्रांतून बातमीदारी केली. दैनिकांतून वरच्या पदांच्या जबाबदार्याही भूषवल्या. शोधपत्रकारिता केली. नैसर्गिक आपत्तींचे याचि देही याचि डोळा चक्षुर्वैसत्यम वृत्तांत दिले. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. या प्रत्येक बाबतीत त्यांच्यावर खंडशः ग्रंथ निघू शकतील. स्वतः साप्ताहिक चालवले, मित्रांची साप्ताहिके, दैनिके व्यवस्थित प्रकाशित व्हावीत म्हणून त्यांनी पदरमोड करून मदतीचा हात दिला.
स. दा. धमाले, ना. मा. निराळे, दत्तकुमार, सहसंवादी, उ. प. नगरवाला, आग्या वेताळ, निर्भय फटकळ, छोटू ठाणेकर, जगदीश जोगेश्वरीकर आदी सुमारे 12 टोपण नावांनी विविध वृत्तपत्रांतून स्तंभ लिहिणार्या विजय वैद्य यांनी शासन अथवा संघटना यांच्याकडून कोणत्याही पुरस्काराची कधी अपेक्षा केली नाही. ठाणे जिल्हा पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक करणार्या विजय वैद्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातही पदे भूषवली आहेत. जव्हारसारख्या ठिकाणी काकी वैद्यांच्या पोटी जन्माला आलेल्या विजय वैद्यांचा ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर असा वास्तव्यासाठीचा संचार सुरू होताच. भाड्याचं घर, बोर्डिंगमध्ये राहणे अशा विविध अनुभवानंतर जेमतेम स्वतःचं घर ते मिळवू शकले. पत्नी वैशाली आणि पुत्र वैभव आणि विक्रांत यांना सांभाळून स्वतःचा प्रपंच चालवता चालवता मुलांनाही त्यांचे संसार उभे करण्याचे त्यांनी बळ मिळवून दिलं. आज दोन्ही मुले स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभी राहून आपलं नावलौकिक टिकवून आहेत.
वृत्तपत्रांच्या कात्रणांच्या गठ्ठ्यांमध्ये राहणारे ज्येष्ठ पत्रकार माझ्या पाहण्यात आहेत. तसे अनेक असतीलही पण दिनू रणदिवे आणि विजय वैद्य हे तर असे आहेत की, वृत्तपत्रे त्यांच्या खोलीत नाहीत तर हे वृत्तपत्रांच्या खोलीत, वृत्तपत्रांच्या ढिगार्यात राहतात असे म्हटले तर अतिशयोक्तीचं होणार नाही.
आजच्याच नव्हे तर सर्व पिढीतल्या पत्रकारांना शिस्तीने वृत्तपत्रांची कात्रणे काढून ती चिकटवून त्यांचा योग्य ठिकाणी ठेवून उपयोग करणे, संदर्भासाठी वापर करणे हे खरंच वैद्यांकडून शिकण्यासारखे आहे. प्रत्येक विषयावरची कात्रणे काढून ती चिकटवून त्यांची बांधणी करून पुस्तक स्वरूपात आपल्याला त्यांच्याकडे पाहावयास मिळतील. भारताचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इथपासून तर सामाजिक समस्यांच्या प्रत्येक विषयांवरच्या बातम्यांच्या कात्रणांची पुस्तके पाहायला मिळू शकतील. 2010 साली संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशोगाथा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची या शीर्षकाचा स्लाइड शो तयार केला आणि त्याचे महाराष्ट्रभर शंभर प्रयोग केले. तरुणांना लाजवील असा उत्साह त्यांच्या अंगी आजही वयाच्या 75 व्या वर्षी पाहावयास मिळतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे विजय वैद्यांचे स्फूर्ती व प्रेरणास्थान! प्रबोधनकारांपासून विजय वैद्यांचा मातोश्रीशी संबंध निकटचा. मग प्रबोधनकार, बाळासाहेब, मीनाताई आणि मग उद्धव-राज तसेच श्रीकांतजींबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. श्रीकांतजींबरोबर विजय वैद्यांनी पंढरीनाथ सावंतांसह सांज मार्मिकमध्येही काम केले आहे. मार्मिकसाठी तर त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना स्थापन होणार, ही बातमी विजय वैद्यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या आधीच नवाकाळला पहिल्या पानावर दिली होती. बाळासाहेबांनी त्यांचे कौतुक एकदा नव्हे तर अनेकदा केले. प्रबोधनकारांच्या प्रशंसेचेही ते धनी ठरले. संसदीय लोकशाहीची सर्व आयुधे पत्रकारितेच्या माध्यमातून माहिती करून घेतलेल्या विजय वैद्यांना त्यांचा वापर करण्यासाठी सभागृहात पाठवणे गरजेचे होते. पण त्यांनी त्याचाही कधी विचार केला नाही.
प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय आणि वाचनालय, मागठाणे मित्रमंडळ, वसंत व्याख्यानमाला, मालवणी जत्रोत्सव, उपनगर मराठी साहित्य संमेलन हे आणि असेच अनेक उपक्रम ही विजय वैद्यांच्या कल्पनेतून साकार झालेले पाहावयास मिळतात. बोरिवली भूषण पुरस्कार मिळवणार्या विजय वैद्यांना वास्ट मीडियाचे अभिजित राणे यांनी मुंबई मित्रच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जीवन गौरव पुरस्कार देऊन समाजातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्याचे मोठे पुण्य आपल्या पदरात पाडून घेतल्याचे पाहताना समाधान वाटते. दोन वर्षांपूर्वी जय महाराष्ट्र नगरमधील रिक्षाचालक मालकांनी 2 तास रिक्षा बंद ठेवून विजय वैद्यांचा साजरा केलेला वाढदिवस हा उपेक्षितांकडून उपेक्षितांचा झालेला सन्मान होता. विजय वैद्य यांनी पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे. अमृत महोत्सव साजरा करणारे विजय वैद्य यांना परमेश्वराने चांगलं आरोग्य देऊन शतकी खेळी करण्याची संधी द्यावी हीच मनोकामना.
– योगेश वसंत त्रिवेदी
9892935321