तुम्ही सुचवा ऐतिहासिक वास्तूसंदर्भातील कामे

0

पुणे । आता नागरिकांना या अंदाजपत्रकासाठी हेरिटेज अर्थात ऐतिहासीक वास्तूसंदर्भातील कामेही सुचविता येणार आहेत. या कामांचा समावेश पालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी अशा कामांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश मुख्यलेखापाल विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
पालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सहभाग वाढविण्यासाठी 2006 पासून हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नागरिकांना आतापर्यंत केवळ रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्वच्छता अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांचीच कामे सुचवू शकत होते.

पालिकेकडून दरवर्षी शहर विकासासाठी अंदाजपत्रक सादर केले जाते. त्यात विभाग प्रमुखांनी सुचविलेल्या तसेच नगरसेवकांनी आपल्या प्रभागात सुचविलेली विकासकामे प्रस्तावित केली जातात. मात्र, अनेकदा स्थानिक नागरिकांना आपल्या परिसरात काय हवे आहे, नेमक्या त्याच कामांचा समावेश नसतो. त्यामुळे 2006 पासून महापालिकेकडून हा उपक्रम राबविला जातो. त्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकात 38 कोटींची तरतूद केली जाते.

नागरी सहभाग वाढविण्याचे प्रयत्न
नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असला तरी, एका वॉर्डमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंतच कामे सुचविता येतात. त्यामुळे नागरिक केवळ 5 कामे सूचवू शकतात. तसेच नागरिकांनी सुचविलेली कामे घ्यायची का नाही, याचे अधिकार प्रभाग समितीला आहे. पालिकेने हेरिटेज वास्तूंचा दर्जा दिलेल्या स्थळांबाबतही काही अर्ज पालिकेस प्राप्त झाले होते. मात्र, प्रशासनाकडून हे अर्ज स्वीकारले जात नव्हते. पुढील वर्षापासून या कामांचे अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले असून त्यासाठी नागरी सहभागाच्या अंदाजपत्रकाच्या अर्जामध्ये ही माहिती स्पष्ट नमूद करण्याचेही या आदेशात स्पष्ट केल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.