दोंडाईचा । येथील जुना शहादा रोड परिसरात तुरळक पाऊस झाला तरी विज गुल होण्याचा प्रकार गेल्या महिनाभरापासुन चालु आहे. दोंडाईचा येथील 132 के.व्ही. सबस्टेशनच्या अंतर्गत हा परिसर येतो. सिंधी कॉलनी, नवरत्न कॉलनी, फैल, चमचम नगर हा रहिवासी परिसर या विभागात येतो. वीज वितरण कंपनीचा रेल्वे गेट जवळील रोहीत्रावर या परिसरातील विद्युत भार आहे. नेहमी कमी जास्त विद्युत दाब, पाऊसाच्या दिवसात खंडीत होणार्या वीज पुरवठयामुळे जुना शहादा रोड परिसरातील वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ट्रान्सफार्मरचा एक फेज गायब
शहरात तुरळक पाऊस झाला तरी या ट्रान्सफार्मरचा एक फेज गायब होतो. ज्यामुळे नागरिकांना रात्री अंधारात राहण्याचा वारंवार योग येतो. कमी जास्त होणारा विद्युत दाब व अचानक रात्री एक फेज गायब झाल्यावर विजेच्या उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जास्तीचे येणारे वीज बील, खंडीत वीज पुरवठा व विद्युत उपकरणांचे नुकसानीतुन ग्राहकांना चांगलाच र्भुदंड सहन करावा लागत आहे.
विजेअभावी झोप नसल्याने आरोग्याचा प्रश्न
दिवस भर राबुन रात्री विजेअभावी झोप होत नसल्याने कामगार व कष्टकर्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परिसरातील नागरिकांकडून विजेच्या समस्ये बाबत कनिष्ट अभियंता तसेच सहाय्यक अभियंता निमगुळ यांना अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली आहे. तरी देखील समस्या कायम असल्याने स्थानिक जनतेचा वीज वितरण कंपनी बाबत रोष वाढला आहे.
वीज कंपनी कडून तात्पुरती मलमपट्टी
अनेक दिवसापासुन हा प्रकार चालु असतांना दरवेळी वीज कंपनी कडून तात्पुरती मलमपट्टी करून वीज पुरवठा सुरळीत केला जातो. पण पुन्हा जैसे थे ची परिस्थिती निर्माण होते. जुना शहादा रोड परिसरात मिल कामगार सामान्य कष्टकर्यांचे वास्तव्य आहे. पाऊसाच्या दिवसात वीज गायब झाल्यास अनेकांना रात्र जागत काढावी लागते ज्यामुळे सकाळचा रोजगार जावुन तोही अर्थिक फटका विज ग्राहकांना सहन करावा लागत आहे. या परिसरात दादासाहेब रावल तालुका दुध संघ, स्टार्च फॅक्टरी व मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत असल्याने कामगारांचे वास्तव्य आहे.