मुंबई : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेखाली होत असलेली तूर खरेदी शनिवारपासून थांबविण्यात आली असून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर कमी भावाने बाजारात विकण्यापेक्षा शेतमाल तारण कर्जाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी केले.
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात तूर खरेदी सुरू होती. या वर्षी राज्यात सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या सूचनेनुसार 22 एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचे उत्पादन अधिक झाले आहे. त्यामुळे तीन महिने तूर खरेदी करूनसुद्धा तूर खरेदी केंद्रावर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत 90 बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. चालू हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांनी दोन लाख 10 हजार क्विंटल शेतमाल या योजने अंतर्गत साठविला आहे. शेतकऱ्यांना त्यांची तूर कमी भावाने बाजारात न विकता बाजार समितीच्या गोदामात ठेऊन त्यावर केवळ सहा टक्के दराने तारण कर्ज घेता येईल. हा माल गोदामात साठविण्यासाठी शेतकऱ्याकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही. या मालाचे संरक्षण व विम्याचा खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येतो. शेतकऱ्यांनी गोदामात माल ठेवल्यास शेतकऱ्यांना त्याचदिवशी बाजार समितीकडून तुरीच्या बाजारभावाच्या 75 टक्के एवढी रक्कम तारण कर्ज म्हणून दिली जाते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही देशमुख यांनी सांगितले.