तुरुंगातील महिला कैद्यांच्या मुलांचे संगोपन नीट करा

0

मुंबई । तुरुंगामध्ये कैदी असलेल्या ज्या महिलांची मुले त्यांच्याबरोबर तुरुंगातच राहत आहेत, अशा मुलांची नीट सोय लावण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. मृदूला भाटकर आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या विशेष खंडपीठापुढे गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. याप्रकरणी 5 ऑक्टोबरपर्यंत संबंधित खाती, अधिकारी यांची बैठक घ्यावी व या प्रश्‍नाबाबत चर्चा करून काय पावले उचलावयाची ते ठरवावे, असे आदेशामध्ये म्हटले आहे. यावर राज्य शासन पुढील सुनावणीच्या वेळी याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

अहवाल 12 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश
राज्यभरातील तुरुंगांमध्ये असलेल्या महिला कैद्यांच्या त्यांच्यासोबत राहत असलेल्या त्यांच्या मुलांच्या भवितव्याबाबत हा प्रश्‍न महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणी 2014 मध्ये दिलेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांची राज्य सरकारने नेमलेली समिती तुरुंग सुधारणांबाबत लक्ष घालत आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वकिलांनी या वेळी खंडपीठाला दिली. या समितीची बैठक 7 ऑक्टोबरला होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, यावर न्यायालयाने सविस्तर टिप्पणी करत या वर्षी 5 ऑक्टोबरपूर्वी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी व अहवाल 12 ऑक्टोबरपर्यंत सादर करावा, असे स्पष्ट केले आहे.