तुरुंगात लालूंना माळीकामाचे मिळणार रोज 93 रूपये

0

हजारीबाग खुल्या तुरूंगात होणार रवानगी

रांची : चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना शनिवारी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. लालूप्रसाद यांना तुरूंगात माळीकाम करावे लागणार असून केलेल्या कामाचे त्यांना पैसेही मिळणार आहेत. या कामापोटी लालूप्रसाद यांना दररोज 93 रूपये मिळतील. चारा घोटाळ्यात कोट्यवधी रूपये हडप केल्याचा आरोप असणार्‍या लालूंना 93 रूपये कष्ट करून मिळवावे लागणार आहेत.

मोदी सरकारवर हल्लाबोल
लालूप्रसाद यांची रवानगी हजारीबाग खुल्या तुरूंगात करण्यात येणार आहे. त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर त्यांना विशेष न्यायालयातूनच जामीन मिळाला असता. तीन वर्षांहून अधिक वर्षांची शिक्षा असल्यामुळे जामिनासाठी लालूप्रसाद यांना आता उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लालूंनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले. हुकूमशाही सरकारला साथ न दिल्यामुळे मला आज शिक्षा भोगावी लागत असल्याचे म्हटले होते.

पाच वर्षांचा कारावास
950 कोटींच्या चारा घोटाळ्यात दुसर्‍यांदा अपराधिक षडयंत्र आणि भ्रष्टाचाराच्या कलमातंर्गत शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी चारा घोटाळ्यातच चाईबासा कोषागारशी निगडीत एका प्रकरणात त्यांना तीन ऑक्टोबर 2013 मध्ये पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि 25 लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

धक्क्याने लालूंच्या बहिणीचे निधन
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा झाल्याच्या धक्क्याने लालूंच्या मोठ्या बहिणीचे रविवारी निधन झाले. गंगोत्री देवी असे त्यांचे नाव असून त्यांच्या निधनामुळे यादव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता त्यांच्या कुटुंबीयांवर निनावी मालमत्ते प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात कारवाईची टांगती तलवार आहे. प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात निनावी मालमत्तेप्रकरणी विस्तृत डॉजिएर तयार केले आहे. निनावी मालमत्तेच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि दोन मुलींविरोधात रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.