तुर्कस्तान अध्यक्षीय पद्धतीच्या वाटेवर

0

इस्तंबुल । तुर्कस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक सार्वमतात 51.37 टक्के मते मिळवून विद्यमान अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन यांनी देशाच्या राजकारणावरील आपली पकड मजबूत केली आहे. एर्दोगन यांच्या अध्यक्षपदाची व्याप्ती आणि ताकद वाढविण्यासाठी देशभरात झालेल्या मतदानापैकी 99.45 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली असून, त्यापैकी 51.37 टक्के तुर्कांनी एर्दोगन यांच्या बाजूने मतदान केले आहे, तर 48.63 टक्के तुर्कांनी विरोधात कौल दिली आहे.

तुर्कस्तानात संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय पद्धत लागू करण्यासाठी एर्दोगन यांनी हे सार्वमत घेतले. त्या दृष्टीने हा महत्त्वाचा निकाल आहे. या निकालामुळे देश आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल करू शकेल, अशी प्रतिक्रिया एर्र्दोेगन समर्थक व्यक्त करत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी ‘एके पार्टी’च्या मुख्यालयाबाहेर समर्थकांनी जल्लोष केला. तुर्कस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी या निकालास आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रिपब्लिकन पीपल्स पार्टी’ने एकूण मतदानापैकी 60 टक्के मतांची पुनर्मोजणी करण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीत ज्या मतपत्रिकांवर शिक्का नव्हता, तीदेखील वैध मानण्यात आली होती, असा दावा रिपब्लिकन पीपल्स पार्टीने केला आहे. या मतमोजणीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोपही या पक्षाने केला आहे. याविरोधात देशातील सर्वोच्च निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे.

आधुनिक तुर्कस्तानचे निर्माते म्हणून केमाल आतातुर्क पाशा यांच्याकडे पाहिले जाते. केमाल यांनी तुर्कस्तानला आधुनिकतेच्या वाटेवर आणण्यासाठी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला होता. त्यालाच एर्दोगन यांनी नख लावल्याचा दावा विरोधक करीत आहेत. तसेच, या सार्वमतावर लष्कराने अध्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी लष्कर कोणती भूमिका घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.