नवी मुंबई । तुर्भे एमआयडीसीतील साकेत केमिकल कंपनीमध्ये शनिवारी सायंकाळी लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने सहा बंबांच्या सहाय्याने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर येथील आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे या कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिली. तुर्भे एमआयडीसीतील साकेत केमिकल कंपनीत रंग बनवण्यात येत होते. त्यामुळे या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल व रंग बनवण्यासाठी लागणारा केमिकलचा साठा ठेवण्यात आला होता.
शनिवारी सायंकाळी या कंपनीमध्ये काही कामगार इलेक्ट्रिकचे काम करत होते. यावेळी शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील केमिकल असल्याने त्याने तत्काळ पेट घेतला. त्याबरोबर कंपनीत काम करणार्या कामगारांनी बाहेर पळ काढला. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिलकचा साठा असल्याने काही वेळातच आग संपूर्ण कंपनीमध्ये पसरली. तसेच शेजारच्या एस. यू. या मसाला कंपनीलादेखील या आगीची झळ पोहोचली. मात्र अश्निशमन दलाच्या जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मसाला कंपनी बचावली.