उस्मानाबाद : विठ्ठल मंदिरातील बडव्याने भाविकाला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, तुळजापूर देवस्थानच्या पुजार्याने क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. विष्णू भोकरे असे या भाविकाचे नाव असून त्याने या प्रकरणाची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे.
अभिषेकावेळी दुधाचा कलश खाली पडल्याने पुजार्याने आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे विष्णू भोकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन पुजार्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तुळजापूर देवस्थानात पुजार्याकडून भाविकांना धक्काबुक्की आणि मारहाणीचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही पुजार्यांकडून अशाच प्रकारची वागणूक भाविकांना दिली जात असल्याचं पुढे आलं होतं. मात्र, याप्रकरणी आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावेळी थेट तहसीलदारांकडे पुजार्याविरोधात लेखी तक्रारच दाखल झाल्याने कारवाईची शक्यता आहे.
गेल्या महिन्यातदेखील पंढरपूर येथे विठोबाच्या मंदिरात पुजार्याने भाविकाहा मारल्याचे समोर आले होते. यावेळी या पुजार्याला निलंबित करण्यात आले होते. अशा घटनांमुळे पुजार्यांची मुजोरी हल्ली समोर येत आहे. देवाच्या दर्शनासाठी येत असलेल्या भविकांना अशा मारहाण होत असेल तर भाविकांना मंदिरात का यावे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.