व्यसनमुक्तीच्या प्रवासावर आधारित ‘बंडखोर’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे । मला ब्राऊन शुगरसमोर माझे आई-वडील, नातेवाईक, मित्र परिवार कोणी कोणीच दिसत नव्हते. मला केवळ ब्राऊन शुगरची नशा हवी होती, ती धुंदी हवी होती आणि त्यासाठी मी कोणत्याही पातळीवर उतरायला तयार होतो, परंतु आता व्यसनाधिनतेकडून व्यसनमुक्तीच्या प्रवासाकडे पाहिले असता आयुष्य किती चुकीच्या दिशेने जात होते, याची जाणीव होते आणि मुक्तांगण तसेच मैत्री व्यसनमुक्ती केंद्रातील सहकार्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मी परत माणसात परंतु शकलो, व्यसनाधिनतेकडून ते व्यसमुक्तीच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास उलगडून सांगितला तुषार नातू या लेखकाने. निमित्त होते नातू यांनीच लिहिलेल्या व्यसनाधिनतेकडून ते व्यसनमुक्तीच्या प्रवासावर आधारित ‘बंडखोर’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.
व्यसनाधिन व्यक्तींचे अनुभव
अनिल अवचट म्हणाले, व्यसनमुक्तीच्या प्रभावी चळवळीसाठी व्यसनाधीन व्यक्तींनी त्यांचे अनुभव पुस्तकरूपाने सातत्याने मांडल्यास त्यांचे दाहक अनुभव आणि व्यसनाधिनतेमुळे अर्थहीन झालेले आयुष्य वाचून अनेक जण वेळीच सावध होऊ शकतील. सोशल ड्रिंकिंग पासून सुरु झालेला हा प्रवास कधी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत येऊन पोहचतो याचे आपल्यालाल भान उरत नाही. नातू यांनी मांडलेला त्यांचा हा प्रवास पुस्तकाच्या शिरर्षकानुसार खरीखुरी बंडखोरीच आहे.
मला जेलमध्ये जावे लागले….
लेखकाने कथित केलेल्या या प्रवासाचे वर्णन ऐकून उपस्थित आणि मुक्तांगण मध्ये व्यसनमुक्तीसाठी आलेल्या समदुःखी बंधुंच्या अंगावर रोमांच उभे राहीले. नातू म्हणाले, व्यसनाची तलफ भागविण्यासाठी मी नको ते उद्योग देखील केले त्यामुळे मला जेलमध्ये देखील जावे लागले. या सर्व प्रकारामुळे मला नागपूर येथील मुक्तांगणचे पाठबळ असलेल्या ‘मैत्री’ या व्यसमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु मी तिथेही प्रतिसाद देत नव्हतो. शेवटी मी तेथून पळून गेलो आणि नागपूर मध्ये कफल्कवृत्तीने फिरत होतो. त्या दरम्यान रस्त्याच्या कडेला एक मेलेला बेवारस कुत्रा मला दिसला आणि एक दिवस आपली देखील अशीच परिस्थिती होईल या प्रखर जाणिवेने मी भानावर आलो. आपले भविष्य नक्कीच रस्त्यावर मेलेल्या बेवारस कुत्र्यासारखे नसेल याचा निर्धार मनात बाळगून मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होऊन व्यसमुक्तीच्या प्रवासाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.