मुंबई – राज्यातल्या तूर उत्पादकांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक ठरलेली असतानाही तूरखरेदीच्या आग्रहासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला आणि बैठक सुरू असतानाच प्रसिद्धीच्या प्रयत्नात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी करून दाखवलं म्हणत मंत्रिमंडळाच्या बैठकीतला वृत्तांत समाजमाध्यमांतून प्रसारित केल्याचे समजते.
सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना निवदेन दिल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, रांगेत उभे आहेत, तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नाफेडने 22 एप्रिलनंतर तूर खरेदी थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये लाखो क्विंटल तूर सध्या पडून आहे. 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांना टोकण मिळालेले आहेत, त्यांची तूर खरेदी केली जाईल. मात्र ज्यांच्याकडे टोकण नाहीत, त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच तूर विकावी लागणार आहे. व्यापाऱ्यांकडे चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जाते. सरकारकडून नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पाच हजार 50 रूपये प्रति क्विंटल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत तूर नाफेडच्या केंद्रांवर आणता आली नाही, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही तूर खरेदीबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल होती. त्यामुळे 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी रामविलास पासवान यांच्याकडे केली. त्यांनीही यासाठी मंजुरी दिल्याचे समजते.