तूर खरेदीला मुदतवाढ मिळूनही सरकारसमोर अडचण

0
हमीभावाने तूर खरेदीला 15 मे पर्यंत मिळाली मुदतवाढ
मुंबई:- तूर खरेदीसाठी १५ मे पर्यंतची मुदतवाढ दिली असली तरी खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी आवश्यक असलेल्या गोदामाची कमतरता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे खरेदी करण्यात आलेली तूर ठेवायची कोठे हा मोठा प्रश्न आता सरकारच्या समोर उभा राहिला आहे. हमीभावाने तूर खरेदीला १५ मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे. दरम्यान किमान आधारभूत दर योजनेंतर्गत 2017-18 या हंगामासाठी तूर खरेदीची मुदत राज्य शासनाच्या विशेष विनंतीवरून महाराष्ट्रासाठी मुदत  15 मे  पर्यंत वाढवून दिल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहे. यामुळे अधिकाधिक संख्येने शेतकर्‍यांना त्यांच्या तुरीला आश्वासित किंमत मिळू शकणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
२० लाख क्विंटल तूर खरेदी
१८ एप्रिल पासून तूर खरेदी बंद ठेवण्यात आली होती. तूर खरेदीसाठीची मुदत ही १५ मे पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी १५ मे पर्यंत तूर खरेदीला मुदतवाढ दिल्याचे पत्र दिले आहे.  केंद्र सरकारकडून तूर खरेदीसाठी ९० दिवसाची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १८ एप्रिल रोजी संपली होती. १८ एप्रिल पासून तूर खरेदी थांबली होती. १८ एप्रिल पर्यंत मार्केटिग फेडरेशनच्या माध्यमातून २० लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे.एकूण ४५ लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. अजूनही शेतकऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे शिल्लक आहे.
गोदामे शिल्लक नसल्याचे शासनासमोर आव्हान
तूर खरेदीसाठी १५ मे पर्यंतची मुदत वाढ दिली असली तरी खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी आवश्यक असलेल्या गोदामाची कमतरता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे खरेदी करण्यात आलेली तूर ठेवायची कोठे हा मोठा प्रश्न आहे. या आगोदरही तूर ठेवायला जागा नसल्यामुळे तूर खरेदी थांबलेली होती. गोदामांची उपलब्धतता नसल्यामुळे तूर खरेदीला मिळालेल्या मुदतवाढीत शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे हे मोठे आव्हानं सरकारच्या पुढे आहे.