तूर खरेदी सुरूच ठेवणार

0

मुंबई :- राज्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारपेठेत तुरीचे दर घसरण्यासोबत आधारभूत किमतीनुसार भाव देणारी नाफेडची केंद्र बंद पडत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. हमीभाव ठरलेला असतानाही शेतकऱ्यांना कमी भावात तूर विकावी लागत असल्याने आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर असूनदेखील अद्यापही अनेक ठिकाणी केंद्रच सुरु झालेली नसल्याने सदस्यांनी लक्षवेधी अंतर्गत सूचना उपस्थित केली. यावेळी बाजार समित्यांमध्ये होणारी तुरीची आवक लक्षात घेता राज्यशासनाच्या विनंतीचा अनुषंघाने अतिरिक्त 1 लाख मेट्रिक टन तुरीची खरेदी करण्यास आणि 120 किमी मर्यादेत साठवणूक करण्यास नाफेडने मान्यता दिली असल्याचे सांगत 15 मार्चनंतर देखील तुरीची खरेदी केंद्र नियमित सुरु राहतील अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

तूर उत्पादक, शेतकऱ्यांचे हाल

या वर्षी राज्यात तुरीचे उत्पादन भरघोस झाले आहे. नाफेड आणि एफसीआय केंद्राच्या माध्यमातून तुरीला 5 हजार 50 रुपये हमीभाव दिलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना 4 हजार 100 रुपये दराने तूर विकावी लागत आहे. तुरीची आवक वाढत असताना शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस खरेदी केंद्रांवर थांबूनसुद्धा शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जात नसल्याचे सांगितले आहे. तूर विकली गेली नसल्याने खाजगी व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत आहे. तसेच विकलेल्या तुरीचे पैसे देखील वेळेवर मिळत नसल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

मी पायऱ्यावर बसणार होतो ! – आ. खडसे

जळगाव जिल्ह्यात तूर उत्पादक केंद्र खूप उशिरा सुरु केल्याचा मुद्दा हाती घेत आ. एकनाथराव खडसे यांनी आपला आवाज चढवला. जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यानंतर तूर खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. ही केंद्र उशिरा सुरु झाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मी या समस्येसाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसणार होतो मात्र ना. सदाभाऊ खोत यांच्या आश्वासनामुळे बसलो नाही असे खडसे म्हणाले. यावेळी खडसे यांनी 15 दिवसाच्या आत पेमेंट करण्याची देखील मागणी केली. यावर हमीभावापेक्षा अधिक तुरीचा भाव वाढेपर्यंत केंद्रामार्फत तूर खरेदी करणार असल्याचे आश्वासन ना. सुभाष देशमुख यांनी दिले।