2005 चं ते साल… महिना नि तारीख नीटशी आठवत नाहीय. पण घटना मात्र आजही ठळकपणे स्मरतेय… तेव्हा मी महानगरमध्ये कार्यरत होतो. त्यादिवशी सकाळीच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करणार्या अखिल पत्रकारांसाठी विकीपीडिया म्हणून ओळखल्या जाणार्या सुबोध मोरे याचा फोन आला. आज दुपारी 4 वाजता मराठी पत्रकार संघात एक पत्रकार परिषद आहे. तू नक्की ये… सुबोधने एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पत्रकार परिषदेसाठी फोन केला तर शक्यतो कोणताच पत्रकार त्याचं म्हणणं टाळत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे सुबोधच्या फोनमुळे बातमी मिळणार हे जवळपास ठरलेलं गणितच आहे आणि म्हणूनच मी मराठी पत्रकार संघात पोहोचलो… कधी नव्हे ते पत्रकार संघाचं सभागृह माणसांनी तुडुंब भरलेलं होतं. क्षणभर मला काहीच कळत नव्हतं की, यातले पत्रकार कोणते? आणि कार्यकर्ते कोणते? गर्दीतून वाटत काढतच कसाबसा पहिल्या तीन रांगांमध्ये जावून बसलो. पत्रकार परिषदेची नियोजित वेळ झाली होती, तेवढ्यात त्याच गर्दीतून एक तरुण पुढे आला… त्याच्या हातात डफ होता… नि डोक्याला पट्टी बांधलेली होती… आम्हा पत्रकारांना काही कळण्याआधीच त्या तरुणाने डफावर थाप मारली… अख्खं सभागृह क्षणात स्तब्ध झालं. आणि अचानकच त्या तरुणाचा पहाडी आवाज कानावर पडला…
उठो साथियों आओ हटके
ना सफल हुयी ये लड़ाई रे
जैसी आजादी चाही थी
ना वैसी आजादी पायी रे…
हे गाणं तो गात होता. जवळपास दहा मिनिटं हे गाणं पत्रकार संघाच्या त्या सभागृहात घुमत होतं. आम्ही सगळेच पत्रकार शांतपणे त्या तरुणाचं गाणं ऐकत होतो… गाणं संपलं आणि पत्रकार परिषद सुरू झाली. त्या परिषदेत जी माहिती मिळाली त्याने मी पत्रकार म्हणून तर खरंच पण एक माणूस म्हणूनही आतूनबाहेरून हादरलो… अरे काय हे? एखाद्यासोबत इतकं भयानक कसं काय घडू शकतं? तोवर अन्याय-अत्याचाराच्या अनेक बातम्या मी कव्हर केलेल्या होत्या. अगदी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्या घटना कव्हर केल्या होत्या. मात्र, त्या तरुणाची कहाणी त्याच्याच तोंडून ऐकल्यानंतर मात्र मन ढवळून निघालं. संवेदनशील मनाचं जे होऊ शकतं ते सारं माझ्याबाबतीत तेव्हा घडून गेलं होतं. पत्रकार परिषद संपली… डेडलाइनमुळे दिवसभराच्या बातम्या घेऊन वेळेत ऑफिसला पोहोचणे बंधनकारक असल्यामुळे मी तिथून निघालो, पण जाताना त्या तरुणाला संध्याकाळी आपण दादरला भेटतोय असं सांगून निघालो. ठरल्याप्रमाणे मी ऑफिसची कामे आटोपून दादरला पोहोचलो. तो तरुणही माझीच वाट पहात होता… आणि मग सुरू झालं त्या तरुणाला नीट समजून घेणं…
आजवर कोणत्याही पत्रकार परिषदेची सुरुवात अशी गाण्याने झालेली मी पाहिली नव्हती. त्यातच ते गाणं म्हणजे इथल्या बेक्कार सिस्टमला लगावलेली मोठी चपराकच होती. मी त्या गाण्याविषयी त्या तरुणाला विचारलं, तर तो म्हणाला, मीच लिहिलंय ते गाणं… एका गाण्याने अवघ्या मीडियला हादरवून टाकणार्या त्या तरुणाचं नाव होतं शंतनू कांबळे… शंतनू उभ्या महाराष्ट्राला विद्रोही शाहीर शंतनू कांबळे म्हणूनच परिचिती होता. 2005 मध्ये शंतनू याला नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो गेला होता. तेव्हाच त्याला अटक करण्यात आली होती. इतकंच नाही तर तब्बल 100 दिवस शंतनूला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. शंतनूच्या अटकेनंतर महाराष्ट्रभर त्याच्या सुटकेसाठी मोठी चळवळ उभी राहिली होती. त्या आंदोलनाचा वाढता दबाव आणि चौकशीतील सत्यता समोर आल्यानंतर शंतनू निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. ज्यादिवशी शंतनूची पोलिसांनी सुटका केली त्याचदिवशी ती पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पोलीस कोठडीतील त्या शंभर दिवसांबद्दल शंतनू सांगत होता. आजवर पिक्चरमध्ये आपण जी थर्ड डिग्री पाहत आलो होतो तिच किंबहुना त्याहून अधिक भयानक आणि खरीखुरी थर्ड डिग्री शंतनूने भोगली होती. त्या थर्ड डिग्रीच्या मूळ हेतूनुसार एकेदिवशी शंतनूही पोलिसांचं खोटं म्हणणं खरं मानायला तयार झाला होता. कारण वेदना सहन करण्याचीही एक मर्यादा असतेच. शंतनू विद्रोही असला तरीही तोही एक माणूसच होता… पण पोलिसांच्या त्या काव्याला शंतनू बधला नाही. तो निर्दोष सुटला. मात्र, पोलिसी अत्याचाराचे सारे पुरावे तो आपल्या शरीरावर घेऊनच कोठडीतून बाहेर आला होता. पोलिसांचा मार खाल्ल्यानंतर हमखास टीबी होतो हे आजवर मी केवळ ऐकून होतो, पण शंतनूमुळे त्यावरही शिक्कामोर्तब झालं होतं. पोलीस कोठडीत थर्ड डिग्री भोगून बाहेर आलेला शंतनू पुढे कधीच बरा झाला नाही. टीबीची लागण झाल्यानंतर त्याला पोटाच्या विकाराने ग्रासलं. हा विकार त्याचा बळी घेऊनच गेला… तब्बेतीमुळे शंतनूने मुंबई सोडली आणि त्याचा नि माझा रोजचा संपर्क जवळपास तुटला. त्यानंतर तो केवळ 6 डिसेंबर यादिवशी आवर्जूून दादरच्या चैत्यभूमीवर यायचा. 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर हे दोन दिवस शंतनूला भेटण्याचे निश्चित दिवस ठरले. या दोन दिवसांत शंतनूला केवळ ऐकायचं… तो खूप बोलायचा… भडकायचा… नेत्यांना शिव्या द्यायचा… मध्येच गाणं म्हणायचा…
शंतून शाहीर होता… त्याच्याकडे एक अतिसंवेदनशील असं मन होतं… या मनातूनच त्याने
समतेच्या वाटेनं खणकावित पैंजण यावं,
तू यावं, तू यावं,
बंधन तोडत यावं…
हे गाणं लिहिलं होतं. मात्र, या गीताची मराठी साहित्याच्या समीक्षकांनी दखल घेतली नाही. त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणंही कदाचित हास्यास्पद ठरू शकले. पण सैराटनंतर आज मराठी सिनेमांचा जो ट्रेंड सुरू आहे तो ट्रेंड पाहता अशा धाटणीच्या सिनेमामध्ये अगदी चपखल बसावं असंच हे गीत आहे. शंतनूच्या हयातीत जर या गीताला योग्य न्याय मिळाला असता तर खरंच खूप बरं झालं असतं. अफसोस, इतकं सुंदर गीत आज केवळ सामाजिक चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांपुरतंच मर्यादित राहिलंय. शंतनू डावा होता की आंबेडकरी विचारांचा होता या भानगडीत मी पडू इच्छित नाही. कारण तो एक कवी होता. तो एक शाहीर होता आणि त्याला क्रांती अपेक्षित होती… मात्र, त्याला रक्तरंजित क्रांती अजिबातच अपेक्षित नव्हती तर त्याला माणसाचं जगणं अधिक सुकर करणारी समतेवर आधारित सामाजिक क्रांती अभिप्रेत होती, हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यामुळे शंतनूला अभिवादन करताना त्याल जय भीम म्हणायचं की लाल सलाम करायचा हा वादच मला फिजूल वाटतो. शंतनू अकाली गेला. पण तो जेवढं जगला तेवढं आयुष्य त्यानं केवळ नि केवळ समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातलं. समाजातील विषमतेबाबत तो कायम अस्वस्थ राहिला. त्याची ही अस्वस्थता दूर करणं हीच खरी तर त्याला वाहिलेली आदरांजली ठरेल, असं मला वाटतं. पण तरीही आता तो निघून गेल्यानंतरही पुन्हा त्याला हाकारावंसं वाटतंय… तेही त्याच्याच गीतातून…
तू यावं, तू यावं
बंधन तोडीत यावं…
उमदा, जिंदादिल शाहीर
शाहीर शंतनू कांबळे या उमद्या, जिंदादिल शाहिराचं 13 जून 2018 रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं… त्याच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होणं केवळ स्वाभाविक आहे. खरंतर कुणाच्याही जाण्याने हळहळ व्यक्त केली जातेच… पण शंतनूचं जाणं हे पोलिसी अत्याचाराचा सबळ पुरावा देणारं आहे. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून शंतनूने तब्बल 100 दिवस पोलिसांची अमानुष थर्ड डिग्री भोगली होती. त्या थर्ड डिग्रीनेच शंतनू खंगत गेला आणि अखेर आपल्यातून कायमचा निघून गेला…
– राकेश शिर्के
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
9867456984