भुसावळ। भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात लिंगभेद केला जातो समाजात तृतीयपंथीयांना अजूनही उपेक्षित नजरेने पाहिले जाते. मात्र तृतीयपंथी देखील समाजातील एक महत्वाचा घटक असून अनेक क्षेत्रात त्यांनी ठसे उमटविले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना आमंत्रण तर सोडाच मात्र ठराविक कार्यक्रम वगळता त्यांची उपस्थिती देखील कुठे पाहायला मिळत नाही. मात्र भुसावळच्या उत्कर्ष कलाविष्कार संस्थेने ही सारी गृहीतके मोडीत काढीत महत्वाच्या ’खानदेश कला महोत्सवा’चे उद्घाटन तृतीयपंथीय दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते करण्याचे ठरवत एक नवीन पायंडा पाडला आहे. 2 जून रोजी सायकाळी 6.30 वाजता दिशा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन भुसावळात होणार आहे.
वैविध्यपूर्ण साहित्याचा आदर्श : दिशा पिंकी शेख हे साहित्य क्षेत्रातले एक महत्वाचे नावं. दिशा यांनी आपल्या समाजाचा संघर्ष त्यांच्या कवितांमधून आणि साहित्यामधून मांडला आहे. बहुलिंगी समाजाच्या कितीतरी समस्या, प्रश्न व त्यांची माणूस म्हणून जगण्यासाठीची धडपड त्यांनी आपल्या लेखणीद्वारे समोर आणली आहे. यामुळे दिशा हे नाव आजच्या युवा पिढीसमोर आदर्श ठरत आहे. वैचारिक मांडणीतून एकूणच विविध समस्यांवर आणि प्रभावावर दिशा यांनी लेखणीतून आसूड ओढले आहेत. त्यांचे लेखन आणि कविता नामांकित दैनिके, मासिके आणि दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या असून त्यांना सामाजिक कार्य आणि लेखनासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
समानता हा प्रमुख उद्देश
दिशा शेख यांना उद्घाटनाचा मान देऊन तृतीयपंथी हा समाजाचा एक घटक असून समाजाने त्यांना सन्मानाने, समानतेने वागवावे हा महत्वाचा उद्देश आहे, असे महोत्सवाचे आयोजक आणि रंगकर्मी प्रा. अनिल कोष्टी यांनी सांगितले. अनेक ठिकाणी त्यांचे संवादाचे कार्यक्रम होत असून कार्यक्रमासाठी त्या पहिल्यांदाच खानदेशात येत आहेत. त्यांची मुलाखत ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील घेणार आहेत, अशी माहिती कोष्टी यांनी दिली.