तृतीय पंथीयाने केली आत्महत्या : सुप्रीम कॉलनीतील घटना

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणार्‍या 24 वर्षीय तृतीयपंथीयाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवार, 17 जून रोजी सकाळी 8.30 वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तराणा उर्फ रहिम शेख रसाय (24, दहिगाव, ता.यावल, ह.मु.सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मृत तृतीयपंथीचे नाव आहे.

राहत्या घरात केली आत्महत्या
यावल तालुक्यातील दहिगाव येथील तराणा उर्फ रहिम ही गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरत येथून जळगावात आली होती. शहरातील सुप्रिम कॉलनीत ती एकटीच भाड्याच्या घरात राहत होती. दरम्यान, तिचा लहान भाऊ हुसेन शेख रयास हा तिच्या घरासमोर आपल्या पत्नीसह वास्तव्यास होता. गुरुवार, 16 जून रोजी रात्री तराणा हिने आपल्या भावाकडे जेवण केले त्यानंतर ती आपल्या घरी निघून गेली. शुक्रवार, 17 जून रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास हुसेनची पत्नी ही तराणा हिला चहा देण्यासाठी गेली असता घरात दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता तराणा हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीला आली.

एमआयडीसी पोलिसात नोंद
याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस कर्मचारी गणेश शिरसाळे व संदीप धनगर यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मतात मृत्यूची नोंद करण्यात आली. तिच्या पश्चात वडील, दोन भाऊ, वहिनी, बहिण असा परीवार आहे.