तृतीय वर्षपूर्तीमध्ये पालघर जिल्हा विकासाच्या वाटेवर

0

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा नव्याने अस्तित्वात आला या एतिहासिक घटनेला 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज रोजी तीन वर्ष पुर्ण झाली. गेल्या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या विकासाने चांगलीच गती घेतली आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहर आहे. पालघर जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक तालुका हा विकासाच्या कामात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावत आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या 29,90,116 एवढी आहे. यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे. आज रोजी जिल्ह्याची सुत्रे डॉ.प्रशांत नारनवरे जिल्हाधिकारी म्हणून सांभाळत आहेत.

पालघर हा बहुल आदिवासी जिल्हा म्हणून संबोधिला जातो. जिल्ह्यात शेती, मासेमारी, रेती, वीटभट्टी व बागायती हे प्रमुख व्यवसाय असून स्थानिक भूमिपूत्र या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात बागायती व मासेमारी तर पूर्व भागात भातशेती, रेती व वीटभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. जिल्ह्याला 112 चौ. कि.मी. अंतराचा समुद्र किनारा लाभला असून समुद्र किनारी असलेल्या अनेक गावांमध्ये मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो. वीटभट्टी व रेती उत्खनन तसेच दगड खानी या व्यवसायाने शेतीचे क्षेत्र कमी होत गेले तरी येथील भूमीपुत्राला वरील व्यवसायांनी आर्थिक योगदान सुबत्ता दिली आहे.

जिल्हयात विपुल वनसंपदा, गौण खनिज असून त्यामधून मिळणारा महसूल जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा हातभार लावत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जिल्ह्यातील वसई, पालघर, बोईसर, डहाणू ही महत्वाची ठिकाणे रेल्वेने जोडली गेली आहेत. रेल्वेचे जाळे असल्यामुळे या परिसरात लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला आहे. त्यातच आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकावर असलेली तारापूर औद्योगिक वसाहत याच जिल्ह्यात आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचे सध्या नागरी सुविधांचे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. भविष्यात हे अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करतील. त्यादृष्टीने प्रशासनान वेळोवेळी अधिकार्‍यांना हाताशी घेवून नियोजन करित आहे.

कुपोषण, ग्रामीण भागातील पाणी टंचाई विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, आश्रमशाळातील शैक्षणिक परिस्थिती, आदिवासी विकास महामंडळातील गैरप्रकार रोखण्याकामी जिल्हाधिकारी कार्यालयावर तर कधी जिल्हा परिषद कार्यालयावर अनेकदा मोर्चे आंदोलने केली यांवर उपाययोजना करण्यासाठी युध्द पातळीवर कामे सुरु करण्यात आली आहेत. याकरिता विशेष समित्यांची निर्मिती देखील करण्यात आली आहे. मार्च 2017 पर्यंत पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट पाणी व स्वच्छता विभागाने ठरवले होते त्यामध्ये प्रशासनाला मोठे यस प्राप्त झाले त्याचबरोबर पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. पेसा अंतर्गत अनेक गावे व पाडे यांची निर्मिती करुन विविध योजना राबविण्यात आल्या. पालघर जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 2016-2017 मध्ये 1,04,906 वैयक्तिक 90 टक्यांपेक्षाही जास्त शौचालाये बांधण्याण्यात आली. पालघर जिल्हा निर्मिती झाल्यापासून नागरिकांची ठाणे येथे कामासाठी करावी लागणारी धावपळ थांबळी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हा जिल्हा आपल्या हिताचा वाटु लागला आहे. या तीन वर्षात जिल्हा प्रशासन झपाट्याने प्रगती करित आहे. विविध अडचणीने जरी ग्रासलेला हा जिल्हा असला तरी त्यांवर काटेकोरपणे उपाययोजना आखुन त्यांची अमलबजावणी करित आहे.

– संतोष पाटील
9049494194