तेंडुलकरला बीसीसीआयचा जोरदार झटका

0

नवी दिल्ली । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असून या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बीसीसीआयकडे सचिनचे काही व्हिडीओ फुटेज मागितले होते. हे व्हिडीओ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली होती. पण बीसीसीआयकडून यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. त्यामुळे सचिनच्या बायोपिकसाठी निर्मात्यांना बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी निश्चित दर भरावे लागणार आहेत. धोनीच्या बायोपिकसाठी दरांमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नाही, तर सचिनसाठी बीसीसीआयने आपल्या नियमात बदल का करावा? असा सवाल एका वरिष्ठ अधिकार्‍याने निर्मात्याला केला केला.

निवृत्तीवेळीचे क्षणचित्रे विनाशुक्ल
‘सचिन : अ बिलियन्स ड्रीम्स’ या सचिनच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी नॉट आऊट 200 निर्मात्यांनी बीसीसीआयकडे त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या क्षणांचे व्हिडीओ मागितले होते. यासाठी बीसीसीआयने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावरील बायोपिकसाठी त्याचा बिझनेस पार्टनर अरुण पांडे यांनी काही व्हिडीओसाठी बीसीसीआयशी संपर्क साधला होता. यावेळी बीसीसीआयनं त्या व्हिडीओसाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील हे स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही काही व्हिडीओंची गरज होती, तेव्हा त्यालाही बीसीसीआयकडून आकारण्यात आलेले शुल्क भरावे लागले. त्यामुळे सचिनसाठी नियमात बदल का करावा? असा सवाल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍याने उपस्थित केला आहे. बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी एक दर निश्चित करण्यात आले असून, सामन्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हे दर निश्चित करण्यात आलेत. बीसीसीआयकडून व्हिडीओमधील प्रत्येक सेकंदानुसार दर आकारले जातात.