तेंडुलकरांचे जाणे!

0

ज्याला स्वतःच्या मृत्यूतही व्यंग दिसले, अशा मनस्वी सच्च्या व्यंगचित्रकाराने जीवनाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली आहे. मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने महाराष्ट्राचे आर. के. लक्ष्मण हरपलेेत. तेंडुलकर केवळ हास्य-व्यंगचित्रकारच नव्हते तर ते साहित्य, नाट्यसमीक्षा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने सृजनशील व्यक्तिमत्वाला पुणेकरच नव्हे तर महाराष्ट्र मुकला. सर्व कला या उत्स्फुर्त आहेत. व्यंगचित्र मात्र प्रक्रियेतून जन्माला येत असते. व्यंगचित्र हे एखाद्या कलाकाराची जेव्हा ओळख ठरते तेव्हा त्या कलाकाराकडून समाजाच्या अपेक्षा उंचावल्या जातात. महाराष्ट्रापुरता विचार करायचे झाल्यास आपल्याला व्यंगचित्रकलेचा मोठा आणि देदीप्यमान वारसा तर मिळालाच; परंतु व्यंगचित्रांनी सामाजिक परिवर्तनेही घडविली.

व्यंगचित्रे आणि त्यातील आशय समजण्याइतकी प्रगल्भता मराठी माणसाला जन्मजात मिळालेली आहे, म्हणूनच आर. के. लक्ष्मण यांची कर्मभूमी हीच माती ठरली. तसेच, मंगेश तेंडुलकर यांच्यासारख्या नररत्नालाही या मातीनेच हदयाचे कोंदण दिले. तेंडुलकरांनी कधी सरकारवर, कधी राजकीय व्यक्तींवर आपल्या कुंचल्यातून फटकारे मारलेत. सामाजिक चिंतेचे आशय त्यांनी रेखाटले. परंतु, एखाद्या ठरावीक विचारसरणीच्या कप्प्यात त्यांनी स्वतःला कोंडून घेतले नाही. म्हणून, त्यांचे व्यंगचित्र झोंबले तरी ते मनाला गुदगुल्या करणारे ठरले. खरे तर व्यंगचित्रे ही अस्थिर कला म्हणावी लागेल. कधी ते काव्यात्मक आशय तर कधी अग्रलेखाची जळजळीत भाषाही व्यक्त करते. तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांनी कधी तात्विक विचार मांडले तर कधी सुरुंगाच्या स्फोटासारखे रौद्ररूप धारण करून चुकीच्या विचारसरणीचे बारूदही नेस्तनाबूत केलेत. विध्वंस हा कलेचा उद्देश नाही, असे तेंडुलकर म्हणत असतं. परंतु, व्यंगचित्रातून त्यांनी जी सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया घडवून आणली, त्याद्वारे बुरसटलेल्या विचारसरणीला मोठा झटका बसला, ही विचारसरणी विध्वंसित करण्याचे कामच तेंडुलकर करत गेले. म्हणून, त्यांचे व्यंगचित्र सर्वोत्तम ठरले. मराठी माणसाला ते भावले, आपले वाटले. या मातीतील माणसांनी त्यांना डोक्यावर घेतले. समाजातील सत्य शोधण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती, सामान्य माणसाच्या मनातले भाव ओळखण्याचे कसब त्यांच्याकडे होते.

पुण्यात राहूनही पुणेरी रग कधीच त्यांच्या अंगात दिसली नाही. सूक्ष्म निरीक्षण शक्तीबरोबरच तरल संवेदनशीलता, आणि उत्तम विनोदबुद्धीही त्यांच्याकडे होती. म्हणून, त्यांची हास्य-व्यंगचित्रे प्रत्येकाला आपली वाटलीत. व्यंगचित्राबरोबर विनोदकाराचे कसबही त्यांच्या अंगी होते. त्यांच्या लेखनातून ते प्रगट झाले. ही लेखन संपदाही मराठी माणसाचा उदात्त वारसा आहे. हा वारसा येणार्या पिढीला हसता हसता अंतर्मुख करायला लावेल. जीवनातील विकृती आणि विसंगतीकडे तेंडुलकर यांनी नेहमीच सकारात्मक आणि दयाबुद्धीने पाहिले. रंजन करण्याबरोबरच डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कामही त्यांनी बेशक केले; आणि त्याबद्दल कुणीही कधीही तक्रार केली नाही, यातच त्यांचे व्यंगचित्रकार म्हणून मोठेपण होते. पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. येथील वाहतूक समस्या तर अकराळ विकराळ बनलेली आहे. या समस्येवर खारीचा का होईना वाटा उचलण्यासाठी तेंडुलकर रस्त्यावर उतरले. त्यांची व्यंगचित्रेच नव्हे तर दस्तरखुद्द रस्त्यावर उतरून ते वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून जनजागृती करत असतं. अनेकवेळा कर्वे रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा सांगणारे तेंडुलकर पुणेकरांनी पाहिले आहेत. गेली 17-18 वर्षे त्यांचा हा शिरस्ता सुरू होता. पुण्यात बरेचवेळा बुलेटवर बसून फेरफटका मारणारे तेंडुलकर पाहिले की, भल्याभल्यांना आश्‍चर्य वाटायचे. व्यंगचित्रांमधून त्यांनी पुणेरी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त कारभारावर जोरदार प्रहार केले. बोचर्‍या पुणेरी भाषेत त्यांनी या बेशिस्तीवर फटकारेही मारले. त्यांच्या व्यंगचित्रांचा वाहतूक शाखेला चांगला फायदा झाला, अगदी फुक्कटचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर त्यांना मिळाला होता. नवखे व्यंगचित्रकार, कवी, लेखक यांना पुस्तक प्रकाशनासाठी कुणाला बोलवावे, असा प्रश्‍न नेहमी पडत असतो. या क्षेत्रातील नावाजलेली नावे असे छोटे-मोठे कार्यक्रम घेत नाहीत. नवख्यांची ही अडचण तेंडुलकर दूर करत असतं. कार्यक्रम छोटा असो की मोठा ते आवर्जून जात. अगदी वेळेवर हजर राहत अन् कार्यक्रमाला शोभा आणत. व्यंगचित्रे आणि विनोद या त्यांच्या आवडत्या विषयावर छानपैकी व्याख्यानही देत असतं. तेंडुलकर व्यंगचित्रकार होते, तद्वत ते नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्यसमीक्षा वाचनीय राहत असे. खरे तर व्यंगचित्र ही माणसाची भूकच असते. या कलेच्या माध्यमातून त्यांनी केवळ थट्टा-मस्करीच नाही तर मानवी स्वभावाला वळण लावण्याचेही प्रयत्न केले. या कलेतून आदर, गौरव, काव्यात्मक आशय व्यक्त करण्याबरोबरच त्यांनी चुकांवर प्रखड भाष्यही केले. तेंडुलकर एकदा म्हणाले होते, समाजात गायक, शिल्पकार, नृत्यकलाकार, चित्रकारांना शत्रू नाहीत. मात्र, व्यंगचित्रकारांना शत्रू असतात. विषयाचे भान ठेवले नाही तर अनर्थ होतो. ते म्हणतात त्यात खोटे काहीच नाही. परंतु, तेंडुलकर हे खर्‍या अर्थाने अजातशत्रू व्यंगचित्रकार होते. आयुष्यभर ते समाजासाठी जगलेत. त्यांच्या निधनाने समाज एका चांगल्या व्यंगचित्रकाराला पारखा झाला आहे. ‘जनशक्ति’तर्फे या महान कलाकाराला विनम्र आदरांजली!