रत्नागिरी – गेले काही दिवस हाय-फाय सुविधांमुळे चर्चेचा विषय ठरलेली तेजस एक्स्प्रेस सोमवारपासून कोकण रेल्वे मार्गावर धाऊ लागली असून तिच्या आरक्षणासाठी प्रवासी, पर्यटकांच्या उड्या पडू लागल्या आहेत, याच मार्गावर आधीपासून धावणारी डबलडेकर बंद पडते की काय, अशी भीती कोकणवासीयांना वाटू लागली आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग तसेच मुंबईतील त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान या मार्गावर उदय डबल डेकर धावणार असल्याचे सांगितल्याने डबल डेकर बंद होणार नाही तर नजीकच्या काळात ती रात्रीच्या वेळी धावेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. वातानुकूलित डबल डेकर दिवसा ऐवजी रात्रीच्या वेळी कोकण रेल्वे मार्गावर धावल्यास तिला कोकणकन्या, राज्यराणी, मांडवी या एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळू शकणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून डबल डेकर धावत आहे. थांबे वेगळे असले तरी साधारण याच मार्गावर सोमवारी सुरू झालेल्या तेजससह जनशताब्दी तसेच मांडवी एक्स्प्रेस धावत असल्याने डबल डेकर प्रतिसादाचे कारण दाखवून बंद केली जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष धावण्याआधीपासूनच तेजसला मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे ङ्गकोरेफची डबल डेकर या सर्वांपासून दूर राहिली आहे.
दरम्यान, सोमवारपासून सीएसटी मुंबई ते करमाळी मार्गावर धाऊ लागलेल्या तेजस एक्स्प्रेसचे दोन्ही बाजुंचे चार दिवसांचे आरक्षण दोन दिवसातच फुल्ल झाले आहे. आरक्षणाची ही स्थिती लक्षात घेता भारतीय रेल्वेची ही नवीकोरी गाडी भविष्यात प्रवासी तसेच पर्यटकांच्या पसंतीस उतरेल, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.