नवी दिल्ली । अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘तेजस एक्स्प्रेस’नंतर रेल्वे मंत्रालय आता आणखी एक एक्स्प्रेस गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही महिन्यांत ‘उदय एक्स्प्रेस’ नावाची अत्याधुनिक सुपरफास्ट गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आरामदायी आसन व्यवस्था, 120 आसन क्षमतेचे एसी कोच, चहा आणि शीतपेयसाठी वेंडिंग मशीन अशा सुविधा ‘उदय एक्स्प्रेस’मध्ये असणार आहेत. ‘उदय एक्स्प्रेस’ दिल्ली-लखनऊसारख्या वर्दळीच्या मार्गावर धावणार आहे.
‘उदय एक्स्प्रेस’मध्ये स्लीपर कोच नसणार
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माहितीनुसार, ‘उदय एक्स्प्रेस’च्या प्रत्येक डब्यात वायफाय स्पीकरसोबतच एलईडी स्क्रीनदेखील असणार आहे. विशेष म्हणजे, ‘उदय एक्स्प्रेस’चे तिकीट दरदेखील कमी ठेवण्यात येणार आहेत. इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या थर्ड एसी प्रवास भाड्यापेक्षाही ‘उदय एक्स्प्रेस’चे तिकीट तर कमी असणार आहेत. सामान्य एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत या एक्स्प्रेस ट्रेनची प्रवासी क्षमता 40 टक्क्यांनी अधिक असणार आहे. मात्र, ‘उदय एक्स्प्रेस’मध्ये स्लिपर कोच नसणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसूनच प्रवास करावा लागणार आहे. पण प्रवाशांना बसण्यासाठी यात आरामदायी व्यवस्था करण्यात आली आहे.
110 कि.मी. प्रती तास वेगाने धावण्याची क्षमता
‘उदय एक्स्प्रेस’मध्ये बायो-टॉयलेटसह डब्यातील इंटेरियरदेखील आकर्षक असणार आहे. सुरेश प्रभू यांनी 2016-17 च्या बजेटमध्ये या एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली होती. ‘उदय एक्स्प्रेस’ची 110 कि.मी. प्रती तास वेगाने धावण्याची क्षमता असणार आहे. रेल्वेकडून अशा अत्याधुनिक सुविधांसह एक्स्प्रेस गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जात असल्या, तरी प्रवाशांच्या वाईट सवयींना कोण रोखणार हाच प्रश्न आहे. कारण नुकत्याच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या ‘तेजस एक्स्प्रेस’मधून प्रवाशांनी हेडफोन्स चोरल्याचे लक्षात आले. पहिल्याच प्रवासात प्रवाशांनी ‘तेजस एक्स्प्रेस’ची अक्षरश: दैना करून टाकली. एका बाजूला रेल्वेकडून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सेवा देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असले तरी काही प्रवाशांच्या करंटेपणाला आवरणार कोण हा प्रश्न आहे.