तेजस रेल्वेची गतिमानता

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी भारतीयांना बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवले. सत्तेवर येताच जगाच्या दौर्‍यावर असताना ते जपानच्याही पंतप्रधानांना भेटले. त्यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली, त्यात बुलेट ट्रेनचा विषयही प्राधान्यावर होता. जपानमध्ये सुमारे 50 बुलेट ट्रेन सध्या धावत आहेत. सन1930मध्ये सर्वात आधी बुलेट ट्रेनचा विचार जपानने केला. त्यानंतर प्रत्यक्षात ती ट्रेन 1964 साली ट्रॅकवर उतरली, तेव्हा त्या ट्रेनचे इंजिन बंदुकीच्या गोळीप्रमाणे टोकदार होते. त्यामुळे तिला बुलेट ट्रेन म्हणून संबोधण्यात आले. त्यानंतर चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन आणली, ती ताशी 268 कि.मी. धावते. पुढे जगभरात वेगवान रेल्वेची स्पर्धा सुरू झाली आणि सन 2007मध्ये फ्रान्सने मैग्लेव बुलेट ट्रेन आणली, जी ताशी 357 कि.मी. धावते. आता जपान पुन्हा या स्पर्धेत उतरला असून, जपानमध्ये ताशी 374 कि.मी. वेगाने धावणारी बुुलेट ट्रेन आहे. या ट्रेनचे रूळ जमिनीखालून विस्तारलेले आहेत, अशा प्रकारे जपान सध्या अधिकाधिक प्रमाणात या वेगवान रेल्वेेचे जाळे पसरवण्याच्या प्रयत्नात असून, 2025 पर्यंत जपानचा कानाकोपरा या ट्रेनने जोडला जाणार आहे. जमिनीखालून रूळ टाकल्याने ही रेल्वे सुरक्षित राहते, तसेच या रेल्वेसाठी बनवण्यात आलेले डबेही अत्याधुनिक स्वरूपातील आहेत. प्रवाशांना यत्किंचितही वेगाची जाणीव होत नाही, इतके सुरक्षित पद्धतीचे डबे तयार करण्यात आले आहेत. कालपर्यंत चीन, जपानमधील टोकदार बंदुकीच्या गोळीप्रमाणे इंजिन असलेल्या पांढर्‍या शुभ्र रंगाच्या बुलेट ट्रेनचे चित्र पाहून भारतीय भुवया उंचावत होत्या. आता भारतीयांना अशा ट्रेनचे स्वप्न पडू लागले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अशा बुलेट टे्रन भारतात आणण्याचा मानस केला आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार एक एक पाऊल पुढे सरकत आहे, हेही नसे थोडके.

सोमवारी 22 मे रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तेजस या गाडीला हिरवा कंदील दाखवणार आहेत. ताशी 200 कि.मी. धावणारी हे रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते करमाळी (गोवा) या मार्गावर चालणार आहे. ज्या मागार्र्वर गोव्याला जाण्यासाठी 11 ते 12 तास लागायचे आता ही ट्रेन अवघ्या 8.30 तासांत करमाळी येथे पोहोचणार आहे. त्याचे भाडेदेखील राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त असणार आहे. भारताने यानिमित्ताने रेल्वेचा वेग 200 कि.मी. गाठला, इतके समाधान या निमित्ताने मिळणार आहे. पण विकसित देशांच्या तुलनेत ही किती मोठी झेप आहे, हे लक्षात यावे म्हणून लेखाच्या सुरुवातीला मुद्दाम बुलेट ट्रेनचे प्रकार कोणते आणि कोणत्या देशांमध्ये त्या धावतात, त्यांच्या वेगाची वैशिष्ट्ये याचा थोडक्यात आढावा घेतला.

त्यामुळे भारतात बुलेट ट्रेन येणार असे जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, तरी ते कितपत वास्तवात उतरणार हादेखील प्रश्‍न आहे. कारण या वेगवान प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी तशी सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे. प्रचलित रेल्वे रूळ बुलेट ट्रेन चालवण्याइतके सक्षम नाहीत तसेच शहर असो वा ग्रामीण भाग असो, रेल्वे रूळ ओलांडण्याची सवय भारतीयांना इतकी जडली आहे की, हादेखील बुलेट ट्रेनकरिता अडथळा ठरणार आहे. फाटकमुक्त रेल्वे होण्यासाठी अजून बरीच वर्षे भारतीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या समस्यांवर मात करून बुलेट ट्रेन भारतात आणायची असेल, तर त्यासाठी संपूर्ण वेगळी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. अर्थात वेगळे रूळ बसवावे लागतील. त्या रुळांच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत बांधावी लागेल, चुंबकीय पद्धतीने गाडी धावणार असेल, तर तसे रूळ बसवावे लागणार आहेत. त्यासाठी पुन्हा जमीन अधिग्रहण, पुनर्वसन हे मुद्दे आलेच. थोडक्यात काय तर बुलेट ट्रेनचा विचार करताना भारताला किती समस्यांना झगडावे लागणार याची थोडक्यात कल्पना करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेवर आले आहेत, तेव्हापासून त्यांनी बुलेट ट्रेन भारतात चालवायचा निर्धार केला आहे. सन 2015मध्ये ते रशियाच्या दौर्‍यावर होते, तेव्हा तेथील सत्ताधार्‍यांशी चर्चा करताना भारतात रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रशियानेही भारताला मदत करण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे तेजस याचा पहिला टप्पा समजायला हरकत नाही. यामुळे प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग 200 किलोमीटर प्रती तास इतका झाला. रशियन रेल्वे सध्या भारतीय रेल्वेसोबत नागपूर ते सिकंदराबाद या 575 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या कामाला लागली आहे. यासाठी रशियन रेल्वेकडून अहवालदेखील सादर करण्यात आला. भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी रशियन रेल्वेकडून अनेक तांत्रिक बदल सुचवण्यात आले. रेल्वे अलाइनमेंटची पुनर्रचना आणि वेग कमी होणार्‍या भागात बदल करण्याच्या सूचना रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेकडे 200 किलोमीटर प्रती तास वेगाने धावणारे डबे नसल्याने नवे प्रवासी डबे आवश्यक असल्याच्या सूचना रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या तसेच देशातील अनेक पुलांवर वेगाची मर्यादा असल्याने रशियन रेल्वेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमार्ग जात असलेल्या भागांची भौगोलिक रचना आणि त्या ठिकाणी असणारी आव्हाने यांचे सर्वेक्षण करण्याची सूचनादेखील रशियन रेल्वेकडून भारतीय रेल्वेला करण्यात आली. यानंतर संबंधित भागात आवश्यक ते बदल किंवा दुरुस्ती करण्यात येईल, असे रशियन रेल्वेकडून सांगण्यात आलेे. भारतात रेल्वेगाड्यांचा ट्रॅक बदलताना वेग कमी होतो. अनेकदा रेल्वेगाडी रेल्वेस्थानकाजवळ येताच रेल्वेगाड्यांचा ट्रॅक बदलतो आणि रेल्वेस्थानक सोडल्यावर त्या दुसर्‍या ट्रॅकवर वळवल्या जातात. यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी होतो. म्हणून 200 किलोमीटर प्रती तासाची वेग मर्यादा गाठण्यासाठी यामध्ये महत्त्वपूर्ण बदल आवश्यक असल्याचे रशियन रेल्वेने म्हटले होते. सध्याच्या रेडिओ संपर्क यंत्रणेपेक्षा डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित संपर्क यंत्रणा असावी, असा प्रस्तावदेखील रशियन रेल्वेकडून देण्यात आला आहे. वेगवान रेल्वेचे जाळे निर्माण करताना सुरक्षेलाही महत्त्व देण्याचा विचार यात मांडला आहे. पादचार्‍यांची आणि रेल्वे क्रॉसिंग करणार्‍यांच्या सुरक्षेचे उपाय करण्याची सूचना करण्यात आली. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी येणारी माणसे आणि जनावरे यांचा विचार करून रेल्वेमार्गांजवळ तारांचे कुंपण उभारावे, वेगाने जाणार्‍या रेल्वेगाड्यांच्या आवाजाचा त्रास रेल्वेमार्गांजवळ राहणार्‍यांना होऊ नये, यासाठी आवाज प्रतिबंधक पत्रे बसवण्याच्या सूचनादेखील रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या आहेत.

अर्थात इच्छाशक्ती असेल, तर हे सर्व भारताला करणे शक्य होणार आहे. सध्या कोकण रेल्वेच्या मार्गावर रशियन रेल्वेने केलेल्या सूचनांपैकी एकाही सूचनेवर काम झाले नाही, तरीही ताशी 200 कि.मी. धावणारी तेजस उद्यापासून कोकण रेल्वेमार्गावर धावेल. खरेतर ही लिटमस टेस्ट ठरणार आहे. सध्याची भारतातील रेल्वे यंत्रणा कितपत तेजसला स्वीकारते, हे उद्याच समजणार आहे. यात जर यशप्राप्ती झाली, तर बुलेट ट्रेनच्या दिशेने छोटेसे पाऊल पडले, असे समजायला हरकत नाही.
राकेश शिर्के – 9867456984