जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे ; भुसावळात ईफ्तार पार्टी
भुसावळ : समाजा-समाजात तेढ निर्माण करणार्यांसाठी राष्ट्रीय एकात्मतेची ही ईफ्तार पार्टी सडेतोड उत्तर असून प्रत्येकाने मोहंमद पैगंबरांच्या संदेशानुसार चालावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. खडका रोड भागातील एम. आय. तेली इंग्लिश मेडियम स्कूल व जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित रोजा ईफ्तार पार्टीत ते बोलत होते.
राष्ट्रीय एकात्मतेची गरज -रक्षा खडसे
ईस्लाम धर्मात रमजान पर्वाला अनन्य महत्व असून ईफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम समाज एकत्र आल्याचा आनंद आहे. भविष्यात सुद्धा सर्व धर्मियांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. सर्व समाज एकत्र राहील्यास व शांततेच्या या मार्गावर चालल्यास पोलिसांचीही गरज पडणार नाही. सर्वांनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र यायला पाहिजे. पोलीस विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पोलीस विभागाने प्रत्येक धर्माचे सण या प्रकारे साजरे करुन राष्ट्रीय एकात्मता निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उपद्रवींना रोखण्याची गरज -संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, सर्वांनी एकमेकांशी चांगले राहणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक समाजात काही उपद्रवी मंडळी असतातच. त्यांना वेळीच रोखले पाहिजे. मुस्लीम समाजाने आपल्या पाल्यांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करावे जेणे करून समाज पुढे जाण्यास मदत होईल.
यांची होती उपस्थिती
अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसेन, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, माजी आमदार दिलीप भोळे, माजी उपमहापौर करीम सालार, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरसेवक युवराज लोणारी, जलील कुरेशी, अमोल इंगळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, नगरसेवक बोधराज चौधरी, नगरसेवक रमेश नागराणी, देवा वाणी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हाजी मुन्ना तेली, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक अरुण हजारे, शहर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले आदींनी परीश्रम घेतले.